सत्ता, सत्य, संघर्ष, राजकारण, समाजकारणाने भरलेली नवी मालिका ‘जिगरबाज’

मनोरंजन
Spread the love

पुणे- ऐतिहासिक मालिकांची पार्श्वभूमी असलेलं डॉ. अमोल कोल्हे यांचे जगदंब क्रिएशन्स पहिल्यांदाच वेगळ्या धाटणीची मालिका घेऊन येत आहे. या मालिकेत सत्ता, सत्य, संघर्ष, राजकारण, समाजकारण असे वेगवेगळे विषय पाहायला मिळणार आहेत,’जिगरबाज’ या नवीन मालिकेत.

सोनी मराठी वाहिनीवर ‘जिगरबाज’ ही नवीन मालिका ११ नोव्हेंबरपासून सोमवार ते शनिवारी रोज रात्री १० वाजता सुरू होते आहे. सत्ता विरुद्ध सत्य असा संघर्ष या मालिकेत पाहायला मिळेल. अभिनेता श्रेयस राजे या मालिकेत डॉ. वरुण बापट ही भूमिका साकारणार आहे. वरुणचे वडील डॉक्टर असतात आणि ते डॉ. मेश्राम यांचे मित्र असतात. अनुभव घेण्यासाठी ते त्याला लोक-आधार रुग्णालयात पाठवतात. कॅनडाला सेटल होण्याचं स्वप्न वरुण पाहतो आहे.

या मालिकेत प्रेक्षकांच्या ओळखीचा आणि आवडीचा एक चेहरा म्हणजे अमृता पवार. या आधी अमृता सोनी मराठी वाहिनीच्या स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत जिजाऊ माँ साहेबांची भूमिका साकारत होती. आता अमृता एका नव्या रूपात नव्या भूमिकेत प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. या मालिकेत अमृता ही डॉ. अदिती हे पात्र साकारणार आहेत. अदिती ही विदर्भातील, गडचिरोली इथल्या एका साध्या आणि छोट्या घरातून आलेली आहे. ती त्यांच्या पूर्ण घरातली पहिली डॉक्टर मुलगी आहे. त्यामुळे आपल्या घरच्यांना आपला अभिमान वाटावा असं काम तिला करायचं आहे. पण छोट्या गावातून आल्यामुळे थोडी भित्री आणि निर्णय घेण्यास कचरणारी अशी अदिती स्वभावानं मात्र मनमिळाऊ आणि समंजस आहे. हि भूमिका साकारताना तिने तेथील भाषा शिकून घेतली आणि राहणीमान सुध्दा ! अभिनेता विजय पाटील हे डॉ. दिगंबर पाटील यांची भूमिका साकारणार आहे. पैसे कमावणं या एकाच उद्देशानी दिगंबर डॉक्टर झाला आहे. हे तीन जिगरबाज लोक-आधार या रुग्णालयाला वाचवण्यासाठी पुढे येऊन काम करताना दिसतील.

या मालिकेत प्रतीक्षा लोणकर, अरुण नलावडे, पल्लवी पाटील , श्रेयस राजे आणि विजय पाटील असे दिग्गज कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. लोक-आधार रुग्णालयाची कथा आणि त्यासाठी होणारा संघर्ष या मालिकेत दिसणार आहे. या रुग्णालयाला वाचवण्यासाठी तीन जिगरबाज डॉक्टर मदतीला येणार आहेत.  

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *