पुणे -मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून त्यात अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसूलीचं टार्गेट दिलेलं होतं, असा आरोप केला होता. या प्रकरणी सिंह यांनी आधी सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. याप्रकरणी उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सीबीआय चौकशी सुरु असताना पदावर राहणं योग्य नसल्याचं कारण देत अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, सीबीआयने आज अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील घरावर छापे टाकले आहेत तसेच त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यावर “काहीजण सुपात आहेत तर काहीजण जात्यात आहेत. हे फार दिवस चालणार नाही,” असे सूचक वक्तव्य करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, “परमेश्वर सर्वांचेच हिशेब चुकते करतो, या जन्मी केलेलं याच जन्मी भोगायचं आहे”, असा टोला लगावला.
पाटील म्हणाले, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनिल देशमुख यांच्यावर सीबीआय कारवाई चालू आहे, तरीही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी या कारवाईला भाजपाचे कारस्थान म्हटले आहे. मुश्रीफ यांचे हे विधान उच्च न्यायालयाचा अवमान करणारे आहे.
ते म्हणाले की, परमवीरसिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर त्या न्यायालयाने प्रकरण गंभीर आहे असे सांगत आधी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा आदेश दिला. उच्च न्यायालयाने या प्रकरणात सीबीआय चौकशीचा आदेश दिला. त्याच्या विरोधात अनिल देशमुख व महाराष्ट्र सरकारने केलेले अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले. या सर्वांमध्ये भारतीय जनता पार्टीचा संबंध कोठे येतो ? त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी भाजपावर केलेला आरोप हास्यास्पद आहे.