पुणे-महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोप होत आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आणखी एक बॉम्ब टाकला आहे. येत्या आठ दिवसात तिसरा मंत्री राजीनामा देईल असे सूचक वक्तव्य केल्याने तो तिसरा मंत्री कोण याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
पुण्यामध्ये त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केले आहे. तो तिसरा मंत्री कोण आहे, हे तुम्हीच शोधा, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. तसेच तुमच्या कर्माने तुम्हीच मरणार आहात, अशी टीकाही त्यांनी केली आहे. सुरुवातीचे गडी आऊट होण्यास वेळ लागतो. परंतु, नंतर रांग लागत असते हे लवकरच दिसून येईल अशी टिप्पणीही त्यांनी केली. राजीनाम्याची यादी तयार आहे. हळूहळू गोष्टी बाहेर येतील, 36 बॉलमध्ये 2 विकेट घेतल्या आहेत, असेही पाटील यांनी नमूद केले.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी जाण्याचे विचारात आहे याबाबत ते म्हणाले, यामध्ये काही चूक नसून माणूस सारखा धडपडत असतो, आशेवर असतो न्याय मिळेल. उच्च न्यायालयात एखादा निर्णय झाला की सर्वोच्च न्यायालयात जाता येते त्याप्रमाणे ते जात असून सर्वाच्च न्यायालय त्याबाबत काय निर्णय करावयाचा हे ठरवेल. सीबीआयचे पथक मुंबईत पोहचले असून त्यांची चौकशी सुरु झालेली आहे. गृहमंत्री यांचा राजीनामा झाला याचा आनंद आम्हास नाही. कारण ज्याप्रकारे महाविकास आघाडी सरकारचे काळे कारनामे सुरु आहे, त्यामुळे त्यांच्या कर्मानेच ते मरणार आहेत. मंत्रीमंडळात सहा ते सात मंत्री असे आहे ज्यांच्या नावापुढे काही ना काही गुन्हा लागलेला आहे. त्याबाबत आम्ही वेळोवेळी आंदोलन केले, त्यामुळे तिसऱया मंत्र्याचा राजीनामा घेण्यात आम्हाला रस नाही, परंतु येत्या आठ दिवसांत ठाकरे सरकारमधील तिसऱ्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल असा गर्भित इशारा पाटील यांनी दिला.