पुणे : कृषी कायदा करताना सरकारने कुणाला विश्वासात घेतलेले नाही. सरकारविरोधात आंदोलन केले की कारवाई होते. संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे, पण सत्तेतील लोकं संविधानाला महत्त्व देत नाहीत की काय असा प्रश्न पडतो, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी आज केले.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक पुणे विचारपीठ व आडकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महामाता रमामाई आंबेडकर यांच्या 124व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार यांनी रमाईंच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्या वेळी ते बोलत होते. अॅड. प्रमोद आडकर, नगरसेविका लता राजगुरू, विठ्ठल गायकवाड, सचिन ईटकर, रवींद्र माळवदकर आदी उपस्थित होते.
महामाता रमामाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल आयोजकांचे अभिनंदन करून रोेहित पवार म्हणाले, लोकांसाठी आयुष्य वेचणार्या महामानवांचे कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी साजरी करताना तरुणांनी विधायक कार्याला महत्त्व दिले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. संविधानाचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले, संविधानाने आपल्याला समानतेचा हक्क दिला आहे. संविधान केंद्रबिंदू मानूनच प्रत्येकाला वाटचाल करावी लागणार आहे. संविधानाचे महत्त्व पटवून देण्याची जबाबदारी आपली आहे.
रवींद्र माळवदकर यांनी महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या निर्मितीविषयी माहिती दिली. पवार यांचे स्वागत महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक व आडकर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले. आभार लता राजगुरू यांनी मानले.
.