‘दगडूशेठ’ च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात

'दगडूशेठ' च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात
'दगडूशेठ' च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात

पुणे : लाखो एलईडी दिव्यांनी उजळलेल्या श्री उमांगमलज रथात विराजमान होऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची वैभवशाली सांगता मिरवणूक बेलबाग चौकातून निघाली आणि तो क्षण अनुभवण्याकरीता हजारो गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली. सलग दुस-या वर्षी दुपारी ४ वाजता दगडूशेठ चे गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्याने सहभागी झाले. संपूर्ण रथावर लावण्यात आलेल्या एलईडी दिव्यांच्या रंगीबेरंगी रोषणाईने मिरवणुकीच्या वैभवात आणखी भर घातली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३२ व्या वर्षी आयोजित सांगता मिरवणुकीला मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास बेलबाग चौकातून प्रारंभ झाला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी यांसह हजारो कार्यकर्ते पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. बेलबाग चौकात आरती करुन मिरवणुकीला प्रारंभ झाला. स्वरुपवर्धिनी ढोल ताशा ध्वज पथक आणि झांज पथकातील वादकांनी गणरायाला पारंपरिक पद्धतीने दिलेली मानवंदना हे मिरवणुकीचे आकर्षण ठरले.

अधिक वाचा  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांनंतर भाजपच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार असेल -अमित शहा : मुख्यमंत्री भाजपचा असण्याचे दिले संकेत

मिरवणुकीच्या अग्रभागी रुग्णसेवा रथ होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक विषयांतर्गत आरोग्य विषयक जनजागृती रथावरुन करण्यात आली. याखेरीज मिरवणुकीत प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्वरूप वर्धिनीचे ढोल-ताशा पथक, सनई-चौघडा असा लवाजमा होता. तसेच केरळमधील चेंदा वाद्याचे वादन कलाकारांनी केले. पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त मोठया संख्येने सहभागी झाले होते.

लक्ष्मी रस्त्यावरुन बाप्पाची मिरवणूक जात असताना ठिकठिकाणी गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने गणरायाला नमन करण्यात आले. मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास टिळक चौकात रथाचे आगमन होताच हा क्षण डोळयात साठविण्यासाठी गणेशभक्तांनी अलोट गर्दी केली. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… च्या जयघोषात रात्री ८. ४५ वाजता पांचाळेश्वर घाट येथे हौदात मूर्तीचे विसर्जन करुन गणरायाला निरोप देण्यात आला.

अधिक वाचा  पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी लीन

श्री उमांगमलज रथ पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी

यंदा उत्सवात साकारलेली प्रतिकृती जटोली शिवमंदिराच्या विषयानुरुप सांगता मिरवणूक रथाची मांडणी करण्यात आली. श्री उमांगमलज रथाच्या माथ्यावर जटा सोडलेली शंकराची मूर्ती होती. त्याच्या बाजूला त्रिशूळ आणि डमरु होते. कळस म्हणून मोठा रुद्राक्ष दाखविण्यात आला. नागाच्या फण्यावर हा तोललेला होता, बाजूला २१ छोटे कळस लावण्यात आले. तर, रथावर २३ नंदींचे चेहरे बसविण्यात आले. रथावर तब्बल १८ क्रिस्टलचे झुंबर लावण्यात आले होते.

याशिवाय रथावर ८ खांब साकारण्यात आले. प्रत्येक खांबावर बेलाच्या पानांचे डिझाईन साकारण्यात आले. रथावर एलईडी व पार लाईटचे फोकस लावण्यात आले. रथामध्ये बाप्पा ज्या ठिकाणी विराजमान होते, तेथे मोराची डिझाईन देखील साकारण्यात आली. त्यामुळे हा अतिशय विलोभलीय रथ व मिरवणूक सोहळा पाहण्यासोबतच अनेकांनी ते नेत्रदिपक क्षण आपल्या मोबाईल कॅमे-यामध्ये टिपले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love