शिरुर (प्रतिनिधि)-शिरुर- हवेली व शिरुर-आंबेगाव या भागात दिवसोदिवस करोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या करोना महामारीने अनेकांचे बळी घेतले असुन त्यामध्ये शेतकरी वर्गाचाही समावेश आहे. त्यामुळे या भागातील अशा सर्व बळी पडलेल्या शेतकरी वर्गासाठी शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष व घोडगंगचे संचालक निळुभाऊ टेमगिरे यांनी केली आहे. राज्याचे गृहमंञी आणि या भागातील आमदार दिलीप वळसे पाटील आणि शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी जातीने लक्ष घालुन शेतकरी वर्गाला मदत मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करावे असे टेमगिरे यांनी म्हटले आहे.
शिरुर तालुका व आंबेगावला जोडलेली ३९ गावातील शेतकरी वर्गाची आर्थिक परिस्थिती नाजुक आहे. करोनाच्या महामारीमध्ये अनेक शेतकऱ्यांना करोनाची बाधा झाली असुन ते वेगवेगळ्या ठिकाणी दवाखान्यात उपचार घेत आहेत. दवाखान्याच्या अवाजवी बिलामुळे त्यांना उपचाराचे बिल भरता येत नाही. शिरुर तालुक्यात बुरुजवाडी या गावात बहुसंख्य शेतकरी वर्ग आहे. त्यांची उपजिविका शेतीवर अवलंबून आहे. करोनाच्या महामारीत १३ शेतकरी बळी पडले आहेत. या व्यतिरिक्त इतर ठिकाणी शेतकरी आहेत, ज्या ठिकाणी शेतकरी करोनाने बाधित असेल किवा उपचार घेत असतील अशांची यादी ग्रामसेवक, तलाठी यांनी बनवून तहसीलदारांकडे द्यावी त्यामुळे अहवाल शासनासमोर जाईल, असे टेमगिरे यांनी सूचित केले आहे.