पुणे—येत्या दि ११ ऑक्टोबर, १ नोव्हेंबर व २२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलावी आणि उमेदवारांची वयोमर्यादा वाढवावी अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी केली. आयोगामार्फत परीक्षा पुढे ढकलण्याऐवजी महाराष्ट्र सरकार मराठा समाजाच्या मुलांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. मंत्रालयातील काही लोकांनी हा कट शिजवलेला असून त्यांच्या मुळेच ही परीक्षा होत असल्याचा आरोपही मेटे यांनी केली.
मराठा विद्यार्थी परिषदेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अनुप देशमुख, परम बिराजदार, अर्चना पाटील, विक्रम गायकवाड, पूजा झोळे उपस्थित होते.
महाराष्ट्र सरकार आणि एमपीएससी यांना शेवटचा इशारा देत असून त्यांनी परीक्षा पुढे ढकलली नाही तर 9 ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन करू. येत्या दोन दिवसात मंत्रिमंडळाची बैठक घेऊन त्वरित निर्णय घ्या. आमचीच काही लोक बाहुले बनून परीक्षा घेण्याबाबत संमती दाखवत आहेत. या विषयावर कोणीही राजकारण करू नये, अशी अपेक्षा ही मेटे यांनी यावेळी केली.
देशमुख म्हणाले की, ग्रामीण भागातील अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करू शकलेले नाहीत. यूपीएससी परीक्षेला ३० ते ३५ टक्के विद्यार्थी हजर होते. जिल्हा सोडून विभागीय स्तरावर परीक्षा केंद्र असल्याने कोरोनाची धास्ती ही आहे. स्थगिती पूर्वी निवड प्रक्रिया सुरु किंवा पूर्ण झाल्या परंतु त्यांना रुजू करून घेतले नाही अश्या सर्व मराठा उमेदवारांना ताबडतोब रुजू करून घ्यावे. मराठा समाजातील एमपीएससी व यूपीएससी परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी पुणे येथे ५००० व दिल्ली येथे १००० विद्यार्थ्यांचे वसतिगृह तातडीने बांधून द्यावे.