2022 पर्यंत सर्वांना स्वतःचे हक्काचे घर देण्यासाठी सरकार कटिबध्द -प्रकाश जवडेकर


पुणे–गरिबांना सक्षम करण्यासाठी प्रत्येकाला घर, स्वच्छ जल, गॅस, शिक्षण, लसीकरण आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे सरकारचे धोरण आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 2022 पर्यंत सर्वांना स्वतःचे हक्काचे घर देण्यासाठी सरकार कटिबध्द असल्याचे, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. तसेच सर्वसामान्य नागरिकाला केंद्र बिंदू मानून स्थानिक स्वराज्य संस्थांनी काम केल्यास सर्वांचे जीवनमान उंचावणार असल्याचेही ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येत असलेल्या च-होली, रावेत आणि बो-हाडेवाडी येथील नियोजित प्रकल्पांतील सदनिकांची संगणकीय सोडत तसेच विविध ठिकाणच्या विकास प्रकल्पांचे ई-भूमिपूजन आणि लोकार्पण केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज (शनिवारी) ऑनलाईन पद्धतीने झाले. त्यावेळी ते बोलत होते.

अधिक वाचा  पुण्यातील उद्याने १ नोव्हेंबरपासून खुली होणार -महापौर

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. आमदार महेश लांडगे, उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे उपस्थित होते.

जावडेकर पुढे म्हणाले महापालिकेच्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला चांगल्या सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली. पण, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने आयोजित करावा लागला. कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोनाचे नियम पाळावे असे आवाहन करून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत देशातील ग्रामीण भागांमध्ये 2 कोटी घरे तर शहरी भागांमध्ये 70 लाख घरे बांधून देण्यात आली आहेत. लाभार्थींना मिळणारी स्वस्त घरे उत्तम असली पाहिजेत.

अधिक वाचा  लसीचे नीट वाटप करा;आम्ही राजकारणाचे उत्तर जरूर देऊ- प्रकाश जावडेकर

विविध योजनांचा निधी गरिब जनतेच्या जनधन खात्यात थेट जमा होत असून याचा जनतेला विशेष आनंद होत आहे. उज्वला योजने अंतर्गत देशातील 8 कोटी घरांमध्ये गॅस सिलेंडर पुरविण्यात आले आहेत. कोरोना विषाणू विरुद्ध लढा देण्यासाठी आत्तापर्यंत दीड कोटी जनतेला मोफत लस देण्यात आली आहे. आगामी काळात 65 वर्षांवरील सर्व तसेच 45 वर्षांवरील आजारी लोकांना सरकारी रुग्णालय मोफत लस दिली जाणार आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love