पुणे—आजपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्याला सरकारने परवानगी दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात कलाकारांची मोठी बिकट अवस्था झाली आहे. याबाबत आनंद व्यक्त करण्यासाठी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरमध्ये मराठी चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी, नाट्य भूमीवरील कलाकार तसेच तंत्रज्ञान, बॅकस्टेज कलाकार यांनी एकत्र येत रंगमंचाचे पूजन केले. दरम्यान, एक पडदा चित्रपटगृहचालकांचा थिएटर सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘सध्या 50 टक्के क्षमतेने ही चित्रपट, नाट्यगृह सुरू राहणार आहेत. मात्र, असे असले तरी हा व्यवसाय पुन्हा सुरू होत आहे याचा आनंद मोठा असल्याचे कलाकारांनी म्हटले आहे. तसेच 50 टक्के क्षमतेने हा व्यवसाय सुरू करायचा असल्याने नाट्यगृहावरील असलेल्या करांचा भारदेखील 50 टक्क्यांनी कमी करावा. तसेच वृत्तपत्रांनी देखील नाट्यसंबंधी जाहिरातींचा दर 50 टक्क्यांनी कमी ठेवावा, अशी अपेक्षा या कलाकारांनी व्यक्त केली. ‘रसिक प्रेक्षकांना पुन्हा नाट्य भूमीकडे वळवण्याच्या दृष्टिकोनातून काही दिवस फुकट कला सादर करायचा मानस देखील या कलाकारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे एकंदरीतच इतक्या मोठ्या कालखंडानंतर पुन्हा एकदा रंगमंचावर कला सादर करण्यासाठी हे कलाकार आसुसलेले आहेत. कधी एकदा प्रेक्षक या रंगमंदिरात येतात याची वाट ते पाहत असून, त्यासाठी त्यांनी प्रेक्षकांना आवाहन देखील केले आहे.
एक पडदा चित्रपट गृहे सुरू न करण्याचा निर्णय
दरम्यान, राज्य सरकारने चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी नवे चित्रपट नसल्याने दाखवायचे काय, असा प्रश्न थिएटरचालकांसमोर आहे. याशिवाय एक पडदा चित्रपटगृहचालकांनी तर थिएटर सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात चित्रपटगृहे सुरू केली, तर अधिक खर्च होईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.तर सरकारने दिलेल्या नियमानुसार चित्रपटगृहे चालवण कठीण असून शहरातील एक पडदा चित्रपट गृहे बंदच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.