पुणे—पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 12 वी पर्यन्त शिक्षण झालेला एक बोगस डॉक्टर नाव बदलून कारेगाव भागात श्री मोरया मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालवत असल्याचे निष्पन्न झाल्याने याठिकाणी उपचार घेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे आता कोरोनाचे संकट वाढले असताना याठिकाणी हा बोगस डॉक्टर 22 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी या बोगस डॉक्टरला बेड्या ठोकल्या आहेत.
या बोगस डॉक्टरचे खरं नाव मेहमूद शेख (वय ३१, बुऱ्हाणपूर, नांदेड) असं आहे. तो कारेगाव भागात श्री मोरया मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालवत होता. तिथे तो स्वत:चं नाव डॉ. महेश पाटील असं वापरत असे. विशेष म्हणजे पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात संबंधित बोगस डॉक्टर हा फक्त बारावी पास असल्याचं समोर आलं आहे. तो गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हॉस्पिटल चालवत होता. मात्र काही दिवसांपूर्वी स्थानिक नागरिकांना त्याच्यावर संशय आला. आरोपीला त्याच्या कुटुंबियांचा फोन आला तेव्हा तो त्यांच्याशी हिंदी भाषेत संभाषण करायचा. फोनवर बोलताना तो फूफा, अम्मी, अबू असे शब्दप्रयोग करायचा. त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्याच्यावर संशय आला. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
पोलिसांनी सोमवारी (12 एप्रिल) त्याच्या रुग्णालयावर छापा टाकून पर्दाफाश केला. हा प्रकार समजल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला. काही रुग्णांच्या नातेवाईकांनी तर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. पोलिसांच्या मध्यस्तीने भांडण सोडवण्यात आलं. बोगस डॉक्टरवर रांजणगाव पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सर्व कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी इतरस्त्र हलवण्यात आले.