नव्या शैक्षणिक धोरणानुरूप शिक्षकांनी मानसिकता बदलावी- ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अ. ल. देशमुख

Teachers should change their mindset according to the new educational policy
Teachers should change their mindset according to the new educational policy

पुणे–“नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्यातील शालेय स्तरावर करण्यासाठी सर्व शिक्षकांना आपली मानसिकता आमूलाग्र बदलावी लागणार आहे. अनुभवाधारित, प्रयोगशील, नवकल्पनांसाठी स्वागतार्ह आणि पूर्णपणे विद्यार्थीकेंद्री असा दृष्टीकोन स्वीकारणे आवश्यक आहे. संशोधकीय मानसिकता, हा त्याचा गाभा असेल,” असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांनी केले. (Teachers should change their mindset according to the new educational policy)

‘विज्ञान भारती’ पुणेतर्फे फर्ग्युसन कॉलेजच्या सहकार्यने ‘इनोव्हेटीव्ह टिचिंग मेथोडॉलॉजी विथ एनईपी परस्पेक्टिव्ह’ (Innovative Teaching Methodology with NEP Perspective) या विषयावर एक दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. डॉ. देशमुख यांच्या बीजभाषणाने कार्यशाळेचे उद्घाटन झाले. प्रसंगी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. स्वाती जोगळेकर, विज्ञानभारतीचे पश्चिम क्षेत्र संघटनमंत्री श्रीप्रसादजी, मुंबई येथील भाभा अणु संशोधन केंद्रातील अणु उर्जा विभाग विज्ञान संशोधन सहयोग संकुलचे अभियंता डॉ. जयंत जोशी, विज्ञान भारतीचे श्रीकांत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेला विविध शाळांमधील ७५ पेक्षा अधिक अध्यापकांची उपस्थिती होती.

अधिक वाचा  तुमचा सोशल मीडियाचा वापर हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा हवा : तरुण आमदारांचे मत

नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अद्याप राज्यातील शालेय शिक्षण स्तरावर लागू झालेले नाही, हे स्पष्ट करून डॉ. देशमुख म्हणाले, “नव्या धोरणाच्या अंमलबजावणीत सुमारे ३० टक्के वाटा त्या त्या राज्याचा असेल. शिक्षणाचा आणि अध्यापनाचा बहुशाखीय दृष्टीकोण, अध्यापनातील आणि अभ्यासविषय निवडण्यातील लवचिकता, संशोधक वृत्ती घडवण्यावर भर, बहुभाषिकत्व, उपयोजित शिक्षणाचा पर्याय, अनुभवात्मक शिक्षण, स्कूल कॉम्प्लेक्स योजना आणि क्लब सिस्टीम, हे नव्या शैक्षणिक धोरणातील कळीचे मुद्दे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांची भूमिका आणि मानसिकता तयार करणे गरजेचे आहे. अशा कार्यशाळांच्या माध्यमातून ही गरज पूर्ण करण्याचे प्रयत्न स्वागतार्ह आहेत.”

विज्ञानभारतीच्या पश्चिम महाराष्ट्र सचिव डॉ. मानसी माळगावकर यांनी सूत्रसंचालन केले. अभिषेक कुलकर्णी यांनी परिचय करून दिला. श्रीप्रसाद आणि वैशाली कामत यांनी विज्ञान भारतीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ. स्वाती जोगळेकर यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. सर्व सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. विज्ञान भारतीच्या माहितीपुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.

अधिक वाचा  सामाजिक न्यायासाठी सर्वांनी एकत्र यावे- विजय सांपला

विज्ञान प्रतिभा शोध परीक्षेची नोंदणी २५ सप्टेंबरपर्यंत

विज्ञान भारतीतर्फे दरवर्षी विद्यार्थी विज्ञान मंथन या राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विज्ञान प्रतिभा शोध परीक्षेचे आयोजन करण्यात येते. इयत्ता सहावी ते अकरावी मधील मराठी तसेच इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभागी होतात. भारतीय वैज्ञानिकांनी विज्ञान क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाची आणि भारतीय वैज्ञानिकांच्या प्रेरणादायी कार्याची व चरित्राची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, हा या परीक्षेचा प्रमुख उद्देश आहे. या परीक्षेसाठी वैयक्तिकरित्या अथवा शाळेच्या माध्यमातून २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. नोंदणी, तसेच अधिक माहितीसाठी www.vvm.org.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन संस्थेतर्फे या कार्यशाळेत करण्यात आले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love