पुणे- “भारतीय संगीत वैविध्यपूर्ण, लालित्याने आणि शब्दाविष्काराने समृद्ध आहे. हिंदी चित्रपट संगीतात नाट्यसंगीत, भक्तीगीत, भावगीत, कव्वाली, लोकगीते, ख्याल, ठुमरी अशा विविधांगी प्रकारांचा अंतर्भाव आहे. सर्व जाती-धर्माच्या, प्रांताच्या कलाकृतींना सामावून घेणारे हिंदी चित्रपट संगीत खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक आहे,” असे मत ज्येष्ठ लेखक संपादक विनय हर्डीकर यांनी व्यक्त केले.
चित्रपट अभ्यासक स्वप्नील पोरे लिखित हिंदी चित्रपट संगीतातील १८२ पार्श्वगायकांवरील ‘स्वरसागर’ या ग्रंथाचे प्रकाशन हर्डीकर यांच्या हस्ते झाले. पत्रकार भवनमध्ये झालेल्या सोहळ्यात ज्येष्ठ संगीततज्ज्ञ सुरेश साखवळकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुणे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस, प्रकाशक प्रवीण जोशी, समीक्षक विश्वास वसेकर आदी उपस्थित होते. दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, सातारा आणि प्रतीक प्रकाशन, पुणे यांच्या वतीने प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले होते.
प्रा. विनय हर्डीकर म्हणाले, “धावपळीच्या जीवनात संगीत हे विसाव्याचे स्थान आहे. भारतीय चित्रपट सृष्टीला संगीत क्षेत्राची मोठी परंपरा आहे. संगीताला वेगळा धर्म चिकटवता येत नाही. अभिरुची संपन्न संगीत निर्मितीमध्ये पार्श्वगायकांसह संगीतकार आणि गीतकार यांचेही योगदान मोलाचे आहे. ‘स्वरसागर’ ग्रंथाद्वारे पोरे यांनी संगीत क्षेत्राचा कोष निर्माण केला आहे. रसग्रहण करायला लावणारा ग्रंथ असून, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांसह इतर अनेक पार्श्वगायकांचे महत्वाचे योगदान यानिमित्त नोंदले गेले आहे.”
सुरेश साखवळकर म्हणाले, “भारतीय चित्रपट संगीत क्षेत्रात अनेक श्रेष्ठ पार्श्वगायक झाले. त्यांची गीते आजही मनावर कोरली गेली आहेत. हा ग्रंथ चाळताना पुन्हा बालपण आणि तरुणपण अनुभवता आले. आठवणींना उजाळा मिळाला. सिने संगीताची लोकप्रियता आहे. तेही उत्तम दर्जाचे संगीत आहे, हे विद्वान किंवा शास्त्रीय संगीत उत्तम असे मानणाऱ्या कलावंतांनी ध्यानात घ्यायला हवे. मराठी भाषेतील गायकांनाही न्याय मिळायला हवा. त्यांच्यावरही पुस्तक व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करतो.”
प्रा. विश्वास वसेकर यांनी ‘स्वरसागर’ हा ग्रंथ म्हणजे संगीतक्षेत्राचा कोष असून, पोरे यांनी ग्रंथात प्रत्येक पार्श्वगायकाची वाटचाल अतिशय रंजकपणे मांडली असून, ‘स्वरसागर’च्या निमित्ताने अनेक गायकांच्या गायनप्रवासाचा पट उलगडला असल्याचे सांगितले.
स्मरणातील गाणी आणि त्यांना साज चढवणारे गायक यांच्या स्मृती पुन्हा नव्याने जागृत करणारा हा ग्रंथ असल्याचे शिरीष चिटणीस म्हणाले. प्रास्ताविकात स्वप्नील पोरे यांनी ग्रंथनिर्मिती मागील प्रवास उलगडला. कृपाशंकर शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. संजय ऐलवाड यांनी आभार मानले.