समाजसेवेच्या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि एआयचे सहाय्य घ्यावे : डॉ. दीपक शिकारपूर

Take the help of latest technology and AI in the field of social service
Take the help of latest technology and AI in the field of social service

पुणे: शहरी समस्यांचे स्वरूप समजून घेणे, त्यांच्या निराकरणाचे उपाय योजणे यासाठी काळानुरूप कृत्रिम बुद्धिमत्तेचे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे सहाय्य घेतले पाहिजे, असे मत प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ आणि लेखक डॉ. दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केले. शहरातील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी स्टार्टअप्सचा गांभीर्याने विचार करावा, असेही त्यांनी सुचवले.

रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीच्या ‘माझे शहर, माझे वचन’ या अभियानाअंतर्गत समाजोपयोगी सेवाकार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या फिरोदिया सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला रोटरी  डिस्ट्रिक्ट ३१३१ चे माजी प्रांतपाल आणि पीएनजी एक्स्ल्युझिव्हचे भागीदार अभय गाडगीळ हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष विष्णु भेडा आणि सचिव विशाल कुलकर्णी हेही व्यासपीठावर उपस्थित होते.

अधिक वाचा  ‘देवेंद्रजी, आपसे ये उम्मीद न थी’- सुप्रिया सुळे

याप्रसंगी जीवित नदी या संस्थेला नदी पुनरुज्जीवन विषयात केलेल्या कामासाठी, सोहम् ट्रस्ट यांना गरिबांचे पुनर्वसन व वैद्यकीय उपचार/ शुश्रुषा यातील कामासाठी, डू सेव्ह संस्थेला रस्ते सुरक्षा व इतर सामाजिक कार्यासाठी, पुणे ग्रीन हिल्स गृपला हरित टेकडी संवर्धनासाठी तर स्टुडिओ अल्टरनेटिव्ह या संस्थेला रचनात्मक पुनर्वापर क्षेत्रात केलेल्या कामासाठी सन्मानित करण्यात आले. तसेच, आम्रपाली चव्हाण व संतोष परदेशी यांना रचनात्मक पुनर्वापर क्षेत्रातील कामासाठी, सुनील जोशी व शैलेंद्र पटेल यांना जलस्त्रोत पुनरुज्जीवनासाठी तर सतीश खाडे यांना जलसंवर्धन विषयात केलेल्या कामांसाठी रोटरीच्या वतीने यावर्षीचे ‘माय सिटी माय प्रॉमिस सर्व्हिस एक्सलन्स’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप होते

यावेळी बोलताना डॉ. शिकारपूर म्हणाले, “रोटरीच्या वतीने समाजातील सेवाभावी संस्था आणि व्यक्तींचा गौरव होणे, ही अभिनंदनीय गोष्ट आहे. आताच्या काळात नवकल्पना घेऊन काम करणे गरजेचे आहे. आपल्या उपक्रमांत समाजातील अधिकाधिक घटक सामावून घेणे, जनसहभाग वाढवणे आणि कार्याला शिस्त असणे महत्त्वाचे आहे. समाजसेवेच्या क्षेत्रात तसेच नागरी समस्यांच्या निराकरणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच एआयची मदत घेतली पाहिजे. पुण्यासारख्या शहरात तीन हजारांहून अधिक स्टार्टअप्स आहेत. त्यांना सेवाकार्यात सहभागी करून घेता यावे, असे प्रयत्न आवश्यक आहेत. सीएसआरच्या सोबतीने सीईआर (कॉर्पोरेट एन्व्हायर्नमेंट रिस्पॉन्सिबिलिटी) सारख्या आस्थापनांकडून सहाय्य मिळवले पाहिजे.”

अधिक वाचा  पुणे लोकसभेसाठी कॉँग्रेसकडून 20 जण इच्छुक : माजी मंत्री, विद्यमान; माजी आमदार, प्रदेश पदाधिकारी ते शहराध्यक्षांचा समावेश

अभय गाडगीळ यांनी रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीच्या ‘माझे शहर, माझे वचन’ या अभियानाचे कौतुक केले. समाजोपयोगी उपक्रमांसाठी सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल, याची ग्वाही दिली आणि भावी उपक्रमांना शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी बोलताना विष्णु भेडा म्हणाले की, या अभियाना अंतर्गत पर्यावरणातील प्रदूषण नियंत्रित करण्यासोबतच, रस्ता सुरक्षा व शहर स्वच्छ ठेवण्यासंदर्भात येणाऱ्या जबाबदाऱ्यांबद्दल नागरिकांमध्ये आम्ही जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. याबरोबरच अनेक उपक्रमांद्वारे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचत त्यांनाही या उपक्रमांमध्ये सामील करून घेत आहोत.

‘माझे शहर, माझे वचन’ या अभियानाच्या संचालक प्रियांका कर्णिक तसेच रोटरीच्या व्होकेशनल सर्व्हिसेसच्या संचालक आकांक्षा रांजेकर यांनी उपक्रमाची माहिती दिली. डॉ. शंतनु देशपांडे यांनी आभार मानले. मंजिरी शहाणे यांनी सूत्रसंचालन केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love