वाजेंच्या आरोप प्रकरणी मोक्का नुसार कारवाई करा- चंद्रकांत पाटील


पुणे- मुंबई चे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, निलंबित पोलीस अधिकारी वाजे यांनी केलेल्या आरोपातून राज्यकर्तेच संघटित गुन्हेगारीमध्ये गुंतल्याचे दिसत आहे. या प्रकरणी ज्यांचे उल्लेख होत आहेत, त्यांचे राजीनामे पुरेसे नसून संबंधितांविरुद्ध मोक्का अन्वये गुन्हे दाखल करा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी केली.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खा.प्रताप पाटील चिखलीकर, आ.राहुल नार्वेकर, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक, माजी खा. किरीट सोमय्या, प्रदेश सचिव संदीप लेले या प्रसंगी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, परमबीर सिंग, वाजे या पोलीस अधिकाऱ्यांकडून जी माहिती समोर येत आहे, ती अत्यंत धक्कादायक आहे.या बाबतचे सबळ पुरावे सादर झाले तर या प्रकरणी संबंधित व्यक्तींच्या विरोधात संघटित गुन्हेगारी च्या (मोक्का) कलमाखाली गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे. सामान्य माणसाला जो न्याय लावला जातो तोच न्याय या प्रकरणात नामोल्लेख झालेल्यांना लावावा. वाजे यांनी केलेल्या आरोपांबाबत पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडण्याऐवजी मंत्री अनिल परब यांनी एनआयए, सीबीआय समोर जाऊन स्पष्टीकरण द्यावे,असेही पाटील म्हणाले.

अधिक वाचा  पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीची तब्बल २८ तास ४० मिनिटांनी सांगता: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने रचला इतिहास

कोरोना स्थिती हाताळण्यात आघाडी सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. लसीकरण कार्यक्रमाचा पूर्णतः फज्जा उडाला आहे. आपले अपयश झाकण्यासाठी आघाडी सरकार केंद्रावर जबाबदारी ढकलत आहे. मात्र केंद्राकडून दिल्या गेलेल्या लशींची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यातून राज्याचा खोटेपणा उघड झाला आहे असल्याची टीका पाटील यांनी केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love