पुण्यातील संचारबंदीच्या विरोधात व्यापारी संघटनांचा एल्गार: काळ्या फिती लावून केले साखळी आंदोलन

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात आज (गुरुवार) पुण्यातील ५० पेक्षा जास्त व्यापारी संघटनांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले . जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी रस्त्यावरील विजय टॉकीज ते नाना पेठेतील क्वॉर्टर गेटपर्यंत सहा फुटांचे अंतर ठेवत साखळी करण्यात आली. त्याच बरोबर जिल्हा अधिकारी कार्यालय, पुणे महानगरपालिका, विभागीय आयुक्त कार्यालय, उत्पादन शुल्क अधिकारी कार्यालय, तहसीलदार मुळशी पौड अशी विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आली.

 पुण्यातील व्यापारांनी सरकारच्या आडमुठ्या धोरणाच्या विरोधात जोरात घोषणा बाजी करून सरकारचा निषेध केला. यावेळी , व्यापाऱ्यांची दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाचा निषेध करत ‘मेरा पेट मेरी मजबुरी, दुकान खोलना है जरूरी’ आदी माहितीपर फलक झळकवत आंदोलन केले. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या आंदोलनात दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह व्यावसायिक पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून सहभागी झाले होते.

या वेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष फतेचंद रांका, संदीप नारंग,  ऍड अजिंक्य शिंदे, दर्शन रावल, समीर शेट्टी, प्रसिद्ध शेफ पराग कान्हेरे असे शेकडो व्यापारी या वेळी  या प्रसंगी उपस्थित होते.

यावेळी बोलताना फतेचंद रांका म्हणाले की, सरकारने घेतल्या संचारबंदीचा आम्ही निषेध करतो. उद्या कसल्याही  परिस्थितीत आम्ही आमची दुकाने उघडणार आहोत. सरकारने व्यापाऱ्यांवर अन्याय केला असून लाखो कामगार उपाशी पोटी मरत आहेत.

युनायटेड हॉस्पिलिटी असोसिएशन अध्यक्ष संदीप नारंग म्हणाले,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात करण्यात आलेली संचारबंदीमुळे हॉटेल व्यवसायिकांचे कंबरडे मोडले आहे. हॉटेलांसाठी जेवणाची परवानगी सकाळी ११ ते रात्री ११ पर्यंत द्यावी त्याच बरोबर उत्पादन शुल्क परवाना शुल्काची संपूर्ण माफी करावी. विद्युत दरात औद्योगिक दरात कपात करावी. जी एस टी, शाळेची फी, मालमत्ता कर, वैधानिक शुल्क माफ करावे अशी मागणी त्यांनी केली.

हॉटेल उद्योजक दर्शन रावल म्हणाले, आमच्या उद्योगाला लावलेल्या लॉकडाउन व निर्बंधांवर फेरविचार करून संचारबंदीमुळे आमचे जगणे कठीण झाले आहे. सरकारने योग्य निर्णय घेवून उद्योजकांना दिलासा द्यावा.

प्रसिद्ध शेफ व बिग बॉस फेम व बिग वडापावचे मालक पराग कान्हेरे यांनी आजच्या आंदोलनात सहभागी होवून सरकारने लावलेल्या निर्बंधावर सडकून टीका करून पुण्यात लावलेल्या संचारबंदीचा निषेध केला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *