पुणे- पुण्यातील पूजा चव्हाण प्रकरण चांगलेच तापले आहे. राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा या प्रकरणात संबंध आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. त्यातच या प्रकरणाच्या ऑडिओ क्लिप्स समाज माध्यमात व्हायरल झाल्याने आणखीनच खळबळ उडाली आहे. ही घटना घडल्यानंतर तब्बल पंधरा दिवसानंतर संजय राठोड यांनी पोहरादेवीचे दर्शन घेऊन पत्रकार परिषद घेऊन आपल्या विरुद्ध हे षड्यंत्र असल्याचे आणि आपली नाहक बदनामी केली जात असल्याचे म्हटले होते.
विरोधी पक्ष भाजपाणे मात्र, हे प्रकरण लावून धरले असून भाजपच्या प्रदेशाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी गुरुवारी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत संजय राठोड हे हत्यारा असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. या प्रकारणात कोणीही तक्रार केली नसल्याचे कारण देत पोलिस हे प्रकरण दाबत असल्याचा आरोप करून पोलिस संजय राठोड यांच्या दावणीला बांधले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी कोणाचीही तक्रार नसल्याने त्याचा फायदा घेत पोलिस या प्रकरणाचा तपास करण्याचे टाळत आहे असे आरोप हॉट आहेत त्यामुळे आता पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा आणि भाजपच्या पुणे शहर उपाध्यक्ष स्वरदा बापट यांनी आज वानवडी पोलिस ठाण्यात जावून या प्रकरणासंबंधी पहिला तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला आणखी वेगळे वळण लागण्याची शक्यता असून संजय राठोड यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. घटनेच्या कलम 306 व 107 प्रमाणे संजय राठोड यांच्यावर एफआयआर दाखल करावा असा अर्ज स्वरदा बापट यांनी केला आहे.
पूजा चव्हाण प्रकरणात ज्या 12 ऑडिओ क्लिप्स समाज माध्यमांमधून व्हायरल झाल्या आहेत. त्यामध्ये पूजा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर संबंधित पुरावे नष्ट करण्याचे आदेश अरुण राठोड या युवकाला दिले आहेत. या ऑडिओ क्लिपमधून पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचे संबंध होते हे समजते. त्यातून सतत होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून किंवा प्रेमभंग किंवा राठोड यांच्याकडून होणाऱ्या होणाऱ्या दबावामुळे पूजा चव्हाण हिला आत्महत्या प्रेरित केल्याचे निष्पन्न होते आहे आणि सदरील पुरावे नष्ट करण्यास एका युवकला (अरुण राठोड)याला आदेश दिल्याचेही निष्पन्न होते आहे. त्यामुळे याप्रकरणी एफआयआर नोंद करून आणि पुढील कारवाईबाबत लवकरात लवकर आदेश काढावेत आणि आरोपीला अटक करावी अशी मागणी एक सुजाण नागरिक म्हणून करीत असल्याचे स्वरदा बापट यांनी त्यांच्या तक्रार अर्जात म्हटले आहे.