Suresh Kalmadi Passed Away: -पुण्याचे माजी खासदार, केंद्रातील माजी राज्यमंत्री आणि भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांचे मंगळवारी पहाटे ३:३० च्या सुमारास निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून कलमाडी हे दीर्घकालीन आजाराने त्रस्त होते आणि त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे पुण्याच्या राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. सुरेश कलमाडी यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कलमाडी यांचे पार्थिव एरंडवणे येथील त्यांच्या ‘कलमाडी हाऊस’ या निवासस्थानी दुपारी २ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास नवी पेठ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. विविध राजकीय पक्षांतील नेते आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली असून, त्यांच्या निधनाने पुण्याच्या राजकीय इतिहासातील एक प्रदीर्घ पर्व संपुष्टात आले आहे.
लष्करी सेवेपासून राजकारणापर्यंतचा प्रवास
सुरेश कलमाडी यांचा जन्म १ मे १९४४ रोजी झाला होता. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात अत्यंत वेगळ्या क्षेत्रातून झाली होती; राजकारणात येण्यापूर्वी १९६४ ते १९७२ या काळात त्यांनी भारतीय हवाई दलात पायलट म्हणून सेवा बजावली होती. १९७४ मध्ये हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यात रस घेतला आणि तिथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी पुणे शहराच्या राजकारणात अनेक दशके आपले वर्चस्व राखले. त्यांनी लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य म्हणून संसदेत पुण्याचे प्रतिनिधित्व केले, तसेच १९९५ ते १९९६ या काळात केंद्रात रेल्वे राज्यमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.
क्रीडा क्षेत्र आणि पुण्याचा विकास
पुणे शहराला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात कलमाडींचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यांच्या कार्यकाळात पुण्यातील पायाभूत सुविधा, शैक्षणिक संस्था आणि क्रीडा उपक्रमांना मोठी चालना मिळाली. क्रीडा क्षेत्रातील त्यांची ओळख विशेषतः भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष म्हणून होती. २०१० मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे भारताला जागतिक क्रीडा नकाशावर स्थान मिळाले.
मात्र, याच काळात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि २०११ मध्ये त्यांच्यावर दोषसिद्धीही झाली, ज्यामुळे त्यांच्या प्रतिमेला काहीसा धक्का बसला. २०१६ मध्ये त्यांना ऑलिम्पिक महासंघाचे आजीवन अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते, परंतु कलमाडी यांनी ती जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला होता.
एक प्रभावी नेतृत्व
समर्थकांसाठी ते एक अत्यंत प्रभावी, धाडसी आणि आत्मविश्वासू नेतृत्व होते, तर टीकाकारांनी त्यांच्या वादग्रस्त कारकिर्दीवर नेहमीच बोट ठेवले. असे असले तरी, राजकारण, क्रीडा आणि प्रशासन या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी आपली स्वतंत्र छाप उमटवली आहे.
















