पुणे(प्रतिनिधि)–उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मूळ गावी काटेवाडीतील ग्रामस्थांकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर नियुक्त करून मंत्री करण्याची मागणी सरपंच आणि ग्रामस्थानी एकमताने केली आहे. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेतल्यास बारामती आणि पुण्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळून काम करण्याची ऊर्जा मिळेल, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, “सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवायचं की काय करायचं हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषय आहे. त्यावर मी काय बोलणार?”, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची काटेवाडीतील कार्यकर्ते मागणी करणार आहेत. परिपत्रक काढून सह्यांची मोहीम काटेवाडीतील कार्यकर्ते ते पत्र अजित पवारांना देणार आहेत. सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवून केंद्रात राज्यमंत्री पद मिळावं, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अजित पवारांचे मूळ गाव असलेल्या काटेडीतील कार्यकर्ते ही मागणी करणार आहेत.
पुण्यातील उपाय योजनांबाबत सुप्रिया सुळे आक्रमक
पुढील १० दिवसांत पुण्यातील पावसासंदर्भातील कामं पूर्ण झाली नाहीत तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशारा खासदार सुप्रिया सुळेंनी पुणे महापालिकेला दिला आहे. सुप्रिया सुळे यांनी आज (दि. 11) पुण्यातील विविध परिसरातील पावसाच्या परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन अशी वेळ पुणेकरांवर का आली आणि ही पावसापूर्वीची कामं अजूनही पूर्ण का झाली नाहीत? असा जाब विचारला.
पुण्यात शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. मान्सुन महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर पु्ण्यातील अनेक परिसरात पाणी साचले. पावसामुळे पुण्यातील अनेक रस्ते देखील ब्लॉक झाले होते. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पुण्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. “पुण्यात समुद्र नाही, याची पुणेकरांना कायम खंत होती, म्हणूनच भाजपने पुण्यात समुद्रही आणला”, असा टोलाही जयंत पाटील यांनी केला.