पुणे(प्रतिनिधि)–माढ्यात रामराजे निंबाळकर आमच्याविरोधात काम करणार असतील तर बारामतीत आम्ही सुद्धा सुनेत्रा पवारांना मदत करणार नाही, असा इशारा दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांनी दिला आहे.
विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनाच भाजपने पुन्हा तिकीट दिले आहे. त्यामुळे भाजपमध्ये असलेले मोहिते पाटील कुटुंब कमालीचे नाराज झाले होते. आतातर धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे धैर्यशील मोहितेच मविआचे उमेदवार असतील हे निश्चित आहे. अशा पद्धतीने महाविकास आघाडीचं माढ्याचं गणित सुकर होत असताना महायुतीत धुसफूस वाढली आहे.
रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोठा विरोध होत आहे. यामध्ये अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर आघाडीवर आहेत. त्यामुळे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह आमदार जयकुमार गोरे आणि आमदार राहुल कुल यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या नेत्यांनी रामराजे निंबाळकर यांची तक्रार केल्याची माहिती आहे.
यानंतर राहुल कुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला निर्वाणीचा इशारा दिला. माढ्यात जर रणजितसिंह निंबाळकरांना मदत करणार नसाल तर आम्हीही बारामतीत सुनेत्रा पवारांना मदत करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून युतीधर्म पाळला जात नाही, असे राहुल कुल यांनी म्हटले आहे.