श्री स्वानंदेश रथातून निघणार ‘दगडूशेठ’ गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक


पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३० व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला शुक्रवार, दिनांक ९ सप्टेंबर रोजी थाटात निघणार आहे. यंदा श्री स्वानंदेश रथामध्ये ‘दगडूशेठ’ चे गणपती बाप्पा विराजमान होणार असून हजारो मोतिया रंगाच्या दिव्यांनी हा रथ उजळून निघणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठीचा श्री स्वानंदेश रथ हा दाक्षिणात्य पद्धतीच्या रचनेमध्ये साकारण्यात आला आहे. 

 श्री स्वानंदेश रथावर ८ खांब साकारण्यात आले आहे. रथाचा आकार १५ बाय १५ फूट असून उंची २४ फूट इतकी आहे. रथावर ५ कळस बसविण्यात आले आहेत. एलईडी व मोतिया रंगाच्या दिव्यामध्ये हा रथ साकारण्यात आला आहे. त्यामध्ये विविध रंगाचे एलईडी लाईटस् देखील वापरण्यात आले आहे.

अधिक वाचा  आम्ही पक्ष सोडला नसून आमदार-खासदारांना पक्षाच्या नेतृत्वात बदल हवा आहे - एकनाथ शिंदे गटाचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

दाक्षिणात्य पद्धतीची रचना हे यंदाच्या रथाचे वैशिष्टय आहे. संपूर्ण रथावर तब्बल १४ शार्दुलच्या मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. तर,  रथाच्या वरच्या बाजूला बसविण्यात आलेल्या ५ कळसांवर कीर्तिमुख देखील लावण्यात आले आहेत.

सांगता मिरवणुकीत अग्रभागी देवळणकर बंधू यांचा नगारा, प्रमोद गायकवाड यांचे सनई वादन असणार आहे. त्यामागे पुण्यातील जगप्रसिद्ध व महत्वाच्या ठिकाणाची चित्रे असलेला व स्वच्छतेचा संदेश देणारा ‘जय गणेश स्वच्छता अभियान रथ’ असणार आहे. त्यामध्ये  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापासून ते हिंजवडी आयटी पार्क पर्यंत आणि श्री कसबा गणपती मंदिरापासून ते पाताळेश्वर लेण्यांपर्यंतची चित्रे लावण्यात आली आहेत. पुणे शहर स्वच्छ व सुंदर करण्याकरिता ट्रस्टतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असून याविषयी अधिकाधिक जनजागृती केली जाणार आहे. याखेरीज मिरवणुकीत स्व-रूपवर्धिनी पथक, दरबार ब्रास बँड, प्रभात ब्रास बँड आणि केरळचे चंडा या पारंपरिक वाद्यांचा समूह असा लवाजमा असेल. पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त मोठया संख्येने सहभागी होणार आहेत.

अधिक वाचा  मलिक यांच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या अखत्यारीतील वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी पुणे येथे सात ठिकाणी ईडीचे छापे

यंदा दगडूशेठ गणपती गणेशोत्सव सांगता मिरवणूक घरबसल्या लाईव्ह पहा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३० व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक जगभरातून घरबसल्या लाईव्ह पाहण्याची संधी भाविकांनी मिळणार आहे. देश -परदेशातील भाविकांना देखील या सांगता मिरवणुकीत सहभागी होण्याची इच्छा असते, मात्र, येथे प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य होतेच असे नाही. त्यामुळे यंदा संपुर्ण सांगता मिरवणूक ट्रस्टची वेबसाईट  http://www.dagdushethganpati.com  यावरून भाविकांना घरबसल्या लाईव्ह पाहता येणार असल्याचे ट्र्स्टतर्फे सांगण्यात आले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love