पुणे(प्रतिनिधी) -वादग्रस्त प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला केंद्र शासनाच्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाकडून (डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अँड ट्रेनिंग) कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. खेडकर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत त्यांनी येत्या २ ऑगस्टपर्यंत लेखी खुलासा करावा, असे आदेश पूजा खेडकर हिला देण्यात आले आहेत.
पूजा खेडकरची प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती करण्यात आली होती. या कालावधीत जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी छळ केल्याचा आरोप खेडकर यांनी केला. खेडकर यांनी वाशीम पोलिसांकडे तक्रार दिली होती. हे प्रकरण पुण्यात घडल्याने वाशीम पोलिसांनी पुणे पोलिसांकडे चौकशी सोपविली. खेडकर यांनी पुण्यात येऊन जबाब नोंदवावा, असे समन्स पोलिसांनी बजावले होते. पुणे पोलिसांनी तीनदा समन्स बजावूनही खेडकर हजर झाल्या नाहीत.
प्रशिणार्थी असताना खेडकर यांनी खासगी आलिशान मोटारीला अंबर दिवा लावला. मोटारीवर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावली. त्यांनी बैठकीसाठी स्वतंत्र दालन,घेतले, तसेच शिपाईही घेतले. प्रशिक्षणार्थी खेडेकर यांच्या बडेजावपणाचे प्रकार उघडकीस आले. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालायील अधिकाऱ्यांनी तक्रार केली. खेडकर प्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकारी दिवसे यांनी राज्य सरकारकडे पाठविला. खेडकर यांच्यावर असलेल्या आरोपाबाबत लेखी खुलासा करण्यात यावा, असे आदेश केंद्रशासनाच्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाने (डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अँड ट्रेनिंग) दिले आहेत. याबाबत खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. याबाबत त्यांनी समक्ष येऊन लेखी खुलासा करावा, असे कारणे दाखवा नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.