पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या ‘हीट अँड रन’ प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक गोष्टी समोर येत आहे. या प्रकरणातील मद्यधुंद अवस्थेत पोर्शे गाडी भरधाव वेगाने चालवून दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीला उडवणाऱ्या अल्पवयीन आरोपीची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे तर त्याचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेन्द्र अग्रवाल हे पोलिस कोठडीची हवा खात आहेत.d अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्यामुळे ससूनचे दोन डॉक्टर आणि एका शिपायाला निलंबित केले असताना रक्ताचे नमुने नक्की कोणाचे घेतले हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीचे बदललेले रक्ताचे नमुने हे एका महिलेचे असल्याचं चौकशी समितीच्या अहवालात नमूद केल्याची माहिती सूत्रांनी असून ती महिला अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवालच असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच शिवानी अग्रवाल या बेपत्ता असल्याची माहिती समोर आल्याने या संशयाला बळकटी मिळाली आहे.
कल्याणीनगर येथील १९ मेच्या मध्यरात्री झालेल्या ‘हीट अँड रन’ प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने घेण्यात आले. मात्र, पोलिसांना नमुने देताना ससूनमधील डॉक्टरांनी दुसरेच रक्ताचे नमुने दिले होते. त्यामुळे त्या रक्तचाचणीत कोणताही दोष आढळून आला नव्हता. मात्र, अनेक दिवस जे रक्त पोलिसांना देण्यात आले होते ते कुणाचे होते, हा प्रश्न अनुत्तरित होता. अखेर या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने बुधवारी अहवाल सादर केला. त्यात मुलाचे रक्ताचे नमुने हे एका महिलेचे असल्याचे समोर आले आहे.
रक्ताच्या नमुन्यात फेरफार
या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने आणि त्याचा तपासणी अहवाल महत्वाचा आहे. तो अहवाल पॉझिटीव असेल तरच अग्रवालच्या धनिक पुत्राचा खटला मजबूत होणार आहे. धनिकपुत्राने मद्यप्राशन केले आहे की नाही, हे तपासण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. मात्र, त्यानंतर घडलेला चक्रावणारा आणि धक्कादायक प्रकार समोर आला. ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरनोळ या दोन वरिष्ठ डॉक्टरांनी मुख्य आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल केल्याचे उघड झाले आहे.
अल्पवयीन मुलाची आई बेपत्ता
या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची आई आणि विशाल अग्रवाल यांच्या पत्नी शिवानी अग्रवाल यांचीही चौकशी होणार असल्याचे समजते. मात्र, शिवानी अग्रवाल बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. मुलाचे रक्ताचे नमुने हे एका महिलेचे असल्याचे समोर आले असताना ससून रुग्णालयातील डॉक्टरांवर दबाव टाकण्याकरता शिवानी अग्रवाल ससून रुग्णालयात स्वतः हजर होत्या अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. त्यामुळे हे रक्ताचे नमुने त्यांचेच असल्याची चर्चा सुरू असून पोलिस त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, पोलिस त्यांना ताब्यात घेईल या भीतीने त्या सध्या बेपत्ता आहेत. त्यांचा मोबाईल देखील बंद आहे. त्यामुळे, मुलाची आई व विशाल अग्रवाल यांच्या पत्नी नेमकं कुठं गायब झाल्या, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.