हिट अँड रन प्रकरणात रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी आणखी दोघांना अटक : अटकेच्या भीतीने दिल्ली, बिहार,गोवा फिरले

हिट अँड रन प्रकरणात रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी आणखी दोघांना अटक
हिट अँड रन प्रकरणात रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी आणखी दोघांना अटक

पुणे( प्रतिनिधी) – कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणात तब्बल तीन महिन्यानंतर ससून रुग्णालयात मुख्य अल्पवयीन आरोपी याच्यासोबत कार मध्ये पाठीमागे बसलेल्या अल्पवयीन दोन मुलांच्या वैद्यकीय तपासणीवेळी रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणात एका मुलाचे वडील व दुसऱ्या मुलाच्या वडीलांचे मित्र यांना मुलांच्या बदल्यात रुग्णालयात रक्ताचे नमुने दिल्याप्रकरणी पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.

आदित्य अविनाश सुद (वय- ५२,रा. सोपानबाग, घोरपडी,पुणे) व अशिष सतिश मित्तल (३७,रा.विमाननगर,पुणे) असे आरोपींचे नाव असून त्यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु.एम.मुधोळकर यांचे न्यायालयात हजर केले असता, २६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, सदर आरोपी हे अटकेच्या  भितीने मागील दहा ते बारा दिवसांपासून दिल्ली, बिहार, गोवा आदी ठिकाणी फिरल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणात एका मुलाचे वडील अद्याप पसार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

अधिक वाचा  ब्लॅकस्टोन पोर्टफोलिओ कंपनी इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्युट (इंडिया) लिमिटेडने 4,000 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी दाखल केले डीआरएचपी

आदित्य सूद हे संरक्षण विभागासाठीचे एव्हिएशन पार्टस बनविणाचे काम करत असून त्यांचा मुलगा विधीसंघर्षित बालकांसोबत पोर्शे कारमध्ये घटनेच्या दिवशी होता. त्याने पार्टीत मद्यप्राशन केले असताना  तसेच तो मद्याच्या अंमलाखाली दिसत असतानाही वैद्यकीय तपासणी दरम्यान अहवालात त्याने मद्यप्राशन केले नसल्याचा नकारात्मक अभिप्राय देण्याकरिता आरोपीने डॉ.श्रीहरी हाळनोर यांना अपप्रेरणा दिली. तसेच वैद्यकीय तपासणीवेळी मुला ऐवजी वडीलांनी रक्ताचे नमुने दिले. तसेच संबंधित रक्ताचा नमुना हा अल्पवयीन मुलाचा असल्याचे वैद्यकीय अभिलेखावर तपासणी फॉर्मवर नमूद करण्यात आले. तर, आरोपी आशिष मित्तल हा रिअल इस्टेटचे काम करत असून घटनेच्या दिवशी कारमध्ये असलेल्या एका मुलाच्या वडीलांचा मित्र आहे. संबंधित मुलाने देखील मद्यप्राशन केले असताना त्याने मद्यप्राशन केले नसल्याचे दाखवण्यासाठी स्वत:च्या रक्ताचा नमुना मुलाचे वडीलांच्या सांगण्यावरुन दिला. आरोपींनी संगनमताने रक्त नमुन्याचे व शासकीय कागदपत्रांचे बनावटीकरण केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

अधिक वाचा  लाखो रुपयांचे स्टील खरेदी करून व्यावसायिकांची फसवणूक करणारी टोळी पकडली

आरोपींना रक्त नमुना बदलण्याबाबत कोणी सांगितले?, कोणाच्या मध्यस्थीने रक्त नमुना बदलला?, रक्त नमुना बदलण्याकरिता कोणी कोणी मदत केली याबाबत आरोपींकडे तपास करणे आहे. रक्त नमुना बदलण्यासाठी लाचेच्या स्वरुपात कोणाशी आर्थिक व्यवहार केला आहे काय? याबाबत सखोल चौकशी करायची आहे. आरोपींनी रक्त नमुना दिला त्यावेळी ससून रुग्णालयात वार्ड क्रमांक ४० येथे डॉ.हाळनोर व कर्मचारी अतुल घटकांबळे यांच्या व्यतिरिक्त इतर कोण सहभागी होते, आरोपींनी अल्पवयीन बालकांचे मुळ रक्ताचे नमुने नष्ट केले आहे किंवा कसे याबाबत आराेपींकडे विचारपूस करणे आहे. आराेपींचे माेबाईल जप्त करणे बाकी असून मोबाईलचे सायबर तज्ञांच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करुन त्याबाबत तपास करणे आहे याकरिता सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.

अधिक वाचा  किडनी विक्री रॅकेटचा पर्दाफाश :१५ लाख रुपयांचे आमिष दाखवून महिलेची किडनी अनोळखी रुग्णावर प्रत्यारोपित

सरकारी वकील शिशिर हिरे यांनी पोलीसांच्या वतीने दूरदृश्यप्रणाली द्वारे न्यायालयात युक्तिवाद केला. तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांनी तपासातील प्रगती व आरोपींचा गुन्हयाचे कटातील सहभागाची माहिती दिली. बचाव पक्षातर्फे ऍड . अबिद गुलानी व सेहूल शाह यांनी प्रतिवाद केला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love