ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांचे निधन : वाचा संपूर्ण जीवन प्रवास


पुणे–ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांचे आज (गुरुवार) सकाळी  ९.१५ वाजताच्या सुमारास दीर्घ आजाराने पुणे पत्रकारनगर येथे राहत्या घरी दुःखद निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.मराठी साहित्यामध्ये त्यांनी त्यांच्या पुस्तकं, लेख यांद्वारे मोलाचे योगदान दिले. त्यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. त्यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय, आणि मोठा मित्रपरिवार आहे.

आज दुपारी दोन वाजेपर्यंत, पत्रकारनगर येथे त्यांचे पार्थिव, अंतिम दर्शनाकरता ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही धार्मिक विधीविना येथील वैकुंठ स्मशानभूमीत विद्युत दाहिनीत अत्यंसंस्कार करण्यात आले. व्यसन मुक्तीच्या क्षेत्रात त्यांनी अतिशय भरीव योगदान दिले होते. त्यांच्या एका लेखा नंतर राज्य सरकारने गर्द या अंमली पदार्थाच्या नायनाटासाठी संस्था उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या.

डॉ. अनिल अवचट हे सामाजिक बांधिलकी मानणारे, सामाजिक जाणीव व भान असणारे,  नि:स्पृह व्यक्तिमत्वाचे एक साहित्यिक, एक पत्रकार,  कलाकार,  चित्रकार,  शिल्पकार,  डॉक्टर आणि बरेच काही होते. इतकी विविध गुणसंपन्नता असूनही त्यांच्यातील सच्चे माणूसपण अधिक विलोभनीय होते. त्यांच्या लेखनातून,  विचारातून , वर्तनातून, कलाकृतीतून हे माणूसपणाचे महत्व सदोदित अधोरेखित झाले आहे. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली.. त्यात बहुतांश लेखन रिपोर्ट पद्धतीचे होते. तरी ते वाचण्याची उत्सुकता निर्माण करण्याची त्यांची लेखन शैली होती. समाजातील उपेक्षित, वंचित, भटक, देवदासी व तळागाळातील बहुजन यांच्या जीवनातील संघर्ष, कष्ट त्यांनी लेखनातून मांडले. एक साधा पण समृद्ध आपल्या निकटचा माणूस आपल्यातून निघून गेला,  ही फार मोठी हानी असल्याची भावना त्यांच्या चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे.

डॉ. अनिल अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यात ओतूर, येथे 1944 मध्ये झाला. त्यांनी फर्ग्यूसन महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्यानंतर 1968 मध्ये पुण्यातीलच बी. जे.  मेडिकल महाविद्यालयात त्यांनी वैद्यकशास्त्राची पदवी घेतली. मुक्तांगण हे पश्चिम भारतातील सर्वात मोठे प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र म्हणून नावारुपाला आले. त्यांनी सामाजिक प्रश्नांवर वेळोवेळी विपुल लेखन केले.

मुक्तांगण परिवारातर्फे दरवर्षी डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत हा पुरस्कार मिळालेल्यांमध्ये पारोमिता गोस्वामी, गिरीश लाड, आबा महाजन, पुण्याचे पार्किन्सन मित्रमंडळ, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, प्रमोद उदार यांचा समावेश आहे. डॉ. अनिल अवचट यांच्या या सामाजिक कार्याची यांना अनेक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त झाले. 2013 मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

अधिक वाचा  मनाची श्रीमंती...

डॉ. अनिता आणि अनिल अवचट यांच्या व्यासांमुक्तीच्या क्षेत्रातील कार्याचा वसा यापुढेसुद्धा असाच पुढे चालू राहील असा दिलासा मुक्तांगणचे अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ही दुःखद बातमी सांगताना दिला.

डॉ. अनिल त्र्यंबक अवचट यांचा परिचय –

एम.बी.बी.एस. जन्म.२६/०८/९९४४

डॉ. अनिता अवचट (१९४४-१९९७) मनोविकार तज्ज्ञ, संस्थापक मुक्तागण व्यसनमुक्ती केंद्र (१९८६) मोठी मुलगी : मुक्ता पुणतांबेकर, संचालक मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र पाकटी मुलगी यशोदा वाकणकर, चित्रकार आणि एपिलप्सी आधार गट संवेदना येथे कार्यरत.

सामाजिक कार्य

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे सह-संस्थापक महाविद्यालयात असल्यापासून सामाजिक कार्याची आवड बिहारमध्ये जाऊन दुष्काळग्रस्तांना मदत केली आणि ते भीषण अनुभव जसेच्या तसे मांडले.  त्यातूनच पूर्णिया” हे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. तेव्हापासूनच विविध चळवळीत सक्रीय सहभाग.  हमाल पंचायत, मराठवाडा विद्यापीठ नामांतर, एक गाव एक पाणवठा, अंधश्रद्धा निर्मुलन, अशा चळवळीत योगदान, सामाजिक कृतज्ञता निधी उपक्रमात सहभाग युवक क्रान्ती दल संघटनेच्या सुरुवातीच्या काळात डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. अरुण लिमये यांचेबरोबर विविध उपक्रमांचे आयोजन.  पर्यावरण, नदी प्रदूषण, बिडी कामगार, देवदासी, भटके, कोळी, भंगी आशा अनेक माणसांच्या प्रश्नावर झोत टाकून समाजाचे लक्ष्य अशा उपेक्षित समाजाकडे वेधून घेणे आणि हे प्रश्न हाती घेण्याचे आवाहन करणे हे व्रतच त्यांनी घेतले आहे.

पत्रकारीता, संपादन आणि लेखन विषयक

डॉ. अनिल अवचट यांनी मराठी पत्रकारितेमध्ये एक नवीन प्रवाह सुरु केला. जसे दिसलं तसं ते लिहित आले आहेत. त्यांचे पहिले पुस्तक “पूर्णिया” हे बिहारमध्ये त्यांनी जे पाहिलं ते तसच लिहीले आहे. त्यानंतर त्यांची ओळख एक वेगळे पत्रकार म्हणून होऊ लागली. त्यांचे लेखन म्हणजे रिपोर्ताज आहेत असे कोणीतरी शोधून काढले. त्यांच्या अशा रिपोर्ताज मध्ये वाचकांच्या डोळ्यासमोर चित्र उभे करण्याची ताकद आणि लिहिलेले संवाद ऐकण्याचे सामर्थ्य होते. या काळात त्यांनी अनेक प्रश्नाचा गावो-गावी जाऊन अभ्यास केला, प्रत्येक प्रश्नासाठी ते विद्यार्थ्यांचे कुतूहल बाळगत परिस्थिती जाणून घेत राहिले. याच काळात त्यांचे बरेचसे लेखन साधना, मनोहर माणूस आशा नामवंत साप्ताहिकात प्रसिद्ध होत होते. साप्ताहिक साधना आणि पुरोगामी सत्यशोधक व साप्ताहिकाचे संपादन म्हणून त्यांनी काम केले आहे.

अधिक वाचा  इतर अभ्यासक्रम बंद करून ३३  कोटी देवांचे अभ्यासक्रम सुरू करा- छगन भुजबळ

लेखनाविषयी

रिपोलॉज, ललित लेख, व्यक्तिचित्रे, स्वतःच्या जगण्यातले विविध अनुभव, वेगवेगळे छंद व कला, कविता, आणि मुलांसाठी कथा असे साहित्याचे विविध प्रकारे त्यांनी साहित्य क्षेत्रात मुशाफिरी केली आहे.

प्रकाशित पुस्तके:

 १. पूर्णिया २. वेध ३. छेद  ४. हमीद ५. कोंडमारा ६. संभ्रम ७. माणसं (इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनुवादीत) ८. धागे आडवे उभे ९. वाघ्यामुरळी १०. धार्मिक. ११. मोर (ललित लेख) १२. स्वत विषयी १३. गर्द ( गर्द व्यसन करणारे तरुण आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या प्रश्नाचा वेध मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या स्थापनेस निमित्त झालेले महत्वाचे पुस्तक) १४. अमेरिका ( प्रवासातील अनुभव आणि अमेरिकेत दिसलेले प्रश्न) १५. आप्त १६. कार्यरत (इंग्रजीमध्ये अनुवादीत) १७. प्रश्न आणि प्रश्न १८. छंदांविषयी १९. दिसले ते २०. जगण्यातील काही २१.  मस्त मस्त उतार (कविता संग्रह) २२. सृष्टीत गोष्टीत २३. वनात जनात २४. मजेदार ओरिगामी २५. पुण्याची अपूर्वाई २६.मुक्तांगणची गोष्ट (इंग्रजीमध्ये अनुवादीत ) २७. शिकविले ज्यांनी २८. रिपोरटींगचे दिवस

काही साहित्यविषयक पुरस्कार:

साहित्य अकादमी पुरस्कार बालसाहित्य गटः पुस्तक सृष्टीत गोष्टीत

फाय फौन्डेशन, इचलकरंजी

महाराष्ट्र फौन्डेशन, अमेरिकेतील मराठी मित्रांची संघटना

महाराष्ट्र शासनाचे उत्तम ग्रंथ पुरस्कार : सलग तीन वर्ष

महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार

दमाणी साहित्य पुरस्कार, सोलापूर

न. चि. केळकर साहित्य पुरस्कार

मुंबई मराठी साहित्य संघाचा अनंत काणेकर पुरस्कार

पत्रकारितेबद्दलचे काही पुरस्कार

डहाणूकर पुरस्कार : दोन वेळा

जयंतराव टिळक स्मृती पुरस्कार

व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्य

  • गर्दच्या व्यसनात अडकलेल्या आजारी मित्र आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या गंभीर समस्येचा अभ्यास करून महाराष्ट्र टाईम्समध्ये लेखमाला.
  • ती लेखमाला वाचून पु.ल. आणि सुनीताबाई देशपांडे अस्वस्थ आणि डॉ. अनिता आणि डॉ. अनिल अवचट यांना उपचार केंद्र सुरु करण्यासाठी प्रेरणा आणि आर्थिक मदत.
  • २९ ऑगस्ट १९८६ मुक्तांगणची स्थापना.  
  • १९८६ ते १९९७ या कालावधीत संस्थेचे सचिव या नात्याने सर्व प्रशासकीय, सरकारी आणि पैसे जमा करण्याची जबाबदारी स्वीकारली.
  • याच काळात पोलिसांशी विशेष सहकार्य करून अमली पदार्थ विक्रेत्यांचे पत्ते रुग्णमित्राकडून काढून घेऊन पोलिसांकडे दिले. त्या आधारे अनेक ठिकाणी पोलीस कारवाई आणि व्यसनी मित्रांना मदत.  
  •  पुणे, नाशिक येथे व्यसन विरोधी वातावरण तयार करण्याचे जनजागरणाचे काम.
  • डॉ. अनिता अवचट यांच्या पश्चात मुक्तांगणची संपूर्ण जबाबदारी.
  • २००० मध्ये मुक्तांगणच्या स्वतःच्या इमारतीत प्रवेश
  • आय. एल. ओ. युएन ओडीसी, कोलंबो प्लान अशा आंतरराष्ट्रीय संघटनांचे सहकार्य.
  • व्यसनी व्यक्तींच्या पत्नींचे पुनर्वसन व्हावे म्हणून सहचारी प्रकल्प
  • संस्थेतील कामाचा दर्जा उत्तम राहावा म्हणून आयएसओ प्रमाणपत्र.
  • कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक नामवंत कंपन्यांशी व्यसनमुक्त अभियान.
  • फक्त महिलांनी चालवलेले आणि फक्त महिलांसाठी असलेले “निशिगंध” हे व्यसनमुक्ती केंद्र सुरु.
  • व्यसनमुक्ती या विषयावर शेकडो व्याख्याने, सर्व माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश देण्याचे व्रत.
अधिक वाचा  पुण्यात ५१ टक्के लोकांना कोरोना होऊन गेल्याचे कळलेच नाही?

सामाजिक कार्य आणि व्यसनमुक्ती विषयक कार्याबद्दलचे काही पुरस्कार आणि सन्मान.

दलित मित्र पुरस्कार

प्रियदर्शनी पुरस्कार

सेवासदनचा देवधर पुरस्कार डॉ अनिता अवचट यांचेसह संयुक्तपणे

सामाजिक न्याय पुरस्कार

महाराष्ट्र शासन: व्यसनमुक्ती क्षेत्रातील अलोकिक कार्याबद्दल.

केंद्र शासनाचा राष्ट्रपती पुरस्कार : वैयक्तिक पातळीवर काम करणारी व्यक्ती म्हणून देण्यात येणाऱ्या पहिल्या पुरस्काराचे मानकरी. (२६ जून २०१३)

चतुरस्त्र व्यक्तिमत्व

डॉ. अनिल अवचट हे चतुरस्त्र व्यक्तिमत्व होते. त्यांचे लेखन, सामाजिक काम यातून वेळ काढून ते अनेक छंद  जोपासत. त्याबद्दलचे त्यांचे पुस्तक छंदांविषयी अनेकांना प्रेरणा देणारे वाटते..

काही महत्वाचे छंद – चित्रकला, फोटोग्राफी, काष्ठशिल्प

ओरिगामी य विषयात तर ते तज्ञ  मानले जात. जपानमध्ये जावून त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन झाले आहे. त्यांनी स्वतः तयार केलेल्या काही खास कलाकृती आहेत ( उदा.  गणपती) या विषयावर त्यांचे एक पुस्तकप्रकाशित असून दुसरे प्रकाशनाचे मार्गावर आहे.

स्वयंपाक: अजूनही त्यांचे खास पदार्थ ते स्वतःच बनवत. 

वत्कृत्व: डॉ. अनिल अवचट यांचे कधीही भाषण नसायचे. ते श्रोत्यांशी संवाद साधत. आपले विचार ते ठामपणे मांडत परंतु,  ते तुम्ही स्वीकारलेच पाहिजेत असा दुराग्रह त्यां चा नसायचा.पल्लेदार वाक्ये, सुभाषितांची उधळण आणि अलंकारिक भाषा टाळून सुद्धा त्यांच्या घनगंभीर आवाजातील बोलणे हृदयस्पर्शी असायचे.

बासरी: बासरी ही जणू त्यांची सखी होती. शिवाय उत्तम संगीत ऐकणे हा त्यांचा आवडता छंद होता.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love