सावरकर आणि लॉकडाऊन

महाराष्ट्र लेख
Spread the love

कोरोना किंवा कोविड-१९ विषाणूच्या प्रार्दुभावामुळे गेले दोन- अडीच महिने आपण सारे लॉकडाऊनमध्ये आहोत. अगदीच आत्यंतिक गरज असल्याविना घरातून बाहेर पडायला बंदी आहे, स्नेही, नातेवाईक ह्यांना भेटायला अनुमती नसली तरी फोन, चॅट, व्हीडीओ चॅट माध्यमातून लोकं एकमेकांच्या संपर्कात आहेत, घरबसल्या सगळ्या जगभरच्या बातम्या कळत आहेत, घरात वीज आहे, पाणी आहे, जेवणाची सगळी व्यवस्था आहे, मनोरंजनाची ऑनलाईन, टीव्ही ही माध्यम उपलब्ध आहेत, वाचायला पुस्तकं आहेत, काही जण तर घरी बसून त्यांचे ऑफिसचे काम म्हणजे वर्क फ्रॉम होम सुद्धा करत आहेत, पण तरीही बहुतांश लोकांना ह्याचा कंटाळा आलाय, उबग आलाय, काहींना तर वैताग आलाय, फ्रस्ट्रेशन आलय. मग विचार करा दोन महिन्यात आपण कंटाळलो तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अकरा वर्ष त्या अंदमानात कशी काढली असतील?

जगाशी संपर्क तुटलेला, त्याच अंदमानमध्ये जन्मठेप भोगत असलेल्या आपल्या थोरल्या बंधूंशी म्हणजे बाबाराव सावरकरांशीही संपर्क करण्यास बंदी, कुठलेही मनोरंजनाचे साधन तर सोडा वर्तमानपत्र किंवा पुस्तकही वाचायला मिळत नव्हते, कागदाचा साधा चिटोरा जरी जवळ सापडला तर कठोर शिक्षा भोगावी लागत असे. आंघोळीसाठी ठराविक आणि तेही समुद्राचे खारे पाणी मिळत असे. न्याहरी व जेवणात मिळणारे अन्न कच्चे किंवा अर्धवट शिजलेले असे, त्यात किडे, पिसवा पडलेल्या असत. प्यायला मिळणारे पाणीही अशुद्ध. शौचाला जायची वेळही ठरलेली, त्याव्यतिरिक्त जायचे असल्यास एकतर मलावरोध करावा लागे किंवा कोठडीत लहान भांड्यात सर्व उरकून घ्यावे लागत असे. त्यामुळे अर्थातच रात्रभर त्याची दुर्गंधी सहन करावी लागत असे. इतका गलिच्छपणा आणि वर कोलू ओढून ठराविक तेलाचा कोटा दररोज पूर्ण करावा लागत असे, काथ्या कुटण्याचे काम करावे लागे. कोलू म्हणजे ज्या तेल काढण्याच्या कोलूला बैलाला जुंपतात तिथे माणसांना जुंपून बैलापेक्षा जास्त तेल काढण्याची सक्ती असे. ताप आला तरी सवलत मिळत नसे. त्याव्यतिरिक्त कारागृहाच्या नियमभंगाच्या नावाखाली इतर शिक्षा होत त्या वेगळ्याच. जसे की सावरकर सर्वात धोकादायक बंदीवान म्हणून आणि इतर बंदीवानाशी संपर्क केला म्हणून अथवा जवळ एखादे कागदाचे चिटोरे सापडले म्हणून नियमभंग केला म्हणून  सहा महिने कठोर एकांतवास, सात वेळा खडी दंडाबेडी व काम करण्याचे नाकारल्याबद्दल १० दिवस खोडाबेडी, एकूण २०-२२ वेळा आडव्या बेड्या, उभ्या बेड्या, हातकड्या, कोठडीबंद्या, अन्नत्याग इत्यादी सर्व शिक्षा सावरकरांनी भोगल्या होत्या. आजारी रुग्णांना दूध देण्यात येई. पण आजारी सावरकरांना फक्त कच्ची पोळी नाहीतर पाणी-भात देण्यात येई. त्यात अंदमानातील तो भयंकर उन्हाळा आणि रोगट हवा. ह्यामुळे बंदीवानाचे प्रचंड शारिरीक आणि मानसिक हाल होत.

इतके हाल सोसूनही त्यांचे मनोधैर्य तर खचले नाहीच पण त्यांनी तशा अमानुष बंदिवासातही हाती साधी कागदपेन्सिल नसतानाही तुरूंगातील भिंतींवर ५ हजार ओळींचे ‘कमला’ हे उत्कट काव्य, नव्हे महाकाव्य लिहिले आणि ते सर्व मुखोद्गत केले.

सावरकर हे जसे महान क्रांतिकारक आणि समाजसुधारक होते, तसेच ते एक महान तत्त्वज्ञही होते. उपयुक्तवाद हे त्यांचे तत्त्वज्ञान होते. आपल्या देहाचा राष्ट्राला उपयोग व्हावा असे त्यांचे स्पष्ट मत होते. म्हणजे कुठल्याही कारागृहात खितपत पडणे ही त्यांची देशभक्तीची कल्पना नव्हती, ते त्यांचे ध्येयही नव्हते. “सावरकरांसारखी उत्कट चैतन्यमय व्यक्ती कारागारात जीवन कंठीत असलेली मी सहनच करू शकत नाही.” असे सावरकरांचा आंग्ल-मित्र डेव्हिड गार्नेटचेही मत होते. “कारागृहात राहून जी करता येत आहे त्याहून काही तरी अधिक प्रत्यक्ष सेवा या आमच्या मातृभूमीची करता येईल अशा प्रकारच्या कोणत्याही अटी मान्य करून मुक्तता करून घेणे हे प्रतियोगी धोरणानेच नव्हे तर समाजहिताचे दृष्टीनेही आमचे परम कर्तव्य आहे.” असे सावरकरांचे स्पष्ट मत होते. दुष्ट शत्रूवर आघात करुन पुन्हा निसटून जाण्याचेही साधतो तोच खरा शूर, तो भित्रा नव्हे, असे सावरकरांचे धोरण होते.

म्हणून मग सावरकरांनी कारागृहातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्यांनी ब्रिटिशांना आवेदनं पाठवून सुटकेची मागणी केली. बर ही सुटकेची मागणी करताना त्यांच्यासह अंदमान तसेच सर्व जगभर अडकून पडलेल्या सर्व बंदीवान, निर्वासितांच्या सुटकेची मागणी केली होती, इतकच नाहीतर त्यांना स्वतःला न सोडता ह्या सर्वांना तत्काळ मुक्त करावे. त्या सर्वांच्या सुटकेत त्यांना स्वतःच्या सुटकेइतकाच आनंद वाटेल अशी निस्वार्थी मागणीही केली होती. म्हणजे सावरकरांची आवेदनपत्रे- मागण्या क्रांतिकारकांच्यावतीने व सर्व क्रांतिकारकांच्यासाठी होत्या, केवळ स्वतः करिता नव्हत्या.

जे जे राजबंदीवान अंदमानातून सुटले त्यातील बहुतांश जणांनी अशाच प्रकारच्या करारपत्रावर स्वाक्षऱ्या करून सुटका करून घेतली होती. अलीपूर बाँब खटल्यातील आरोपी हेमचंद्र दास आणि बारिंद्र कुमार घोष हे १९०८ साली अंदमानात आले व सन १९२० मध्ये ब्रिटिशांनी त्यांना क्षमा करून सोडून दिले. लाहोर कटातील आरोपी सचिंद्रनाथ संन्याल ह्यांनीही सावरकरांप्रमाणेच आवेदनपत्र पाठवली होती, त्यांची सुटका झाली पण सावरकरांची सुटका झाली नाही.

सावरकरांनी कारावासातील मुक्ततेनंतर अटीनुसार राजकारणाव्यतिरिक्त समाजसुधारणा, शुद्धी, विज्ञाननिष्ठता, भाषाशुद्धी, लिपीसुधारणा अशा प्रकारे प्रचंड राष्ट्रसेवा केली.

शत्रूशी खोट बोलल, शत्रूला फसवल, शत्रूशी द्रोह केला तर त्यात गैर काय आहे? सावरकर शत्रूला फसवायचा प्रयत्न करत होते पण ब्रिटीश न फसता स्वकीयच फसले. कधीही कुठलाही ठराव, आवेदन अशा प्रकारची राजकीय पत्रे वाचताना ‘दोन ओळींमधील’ (between the lines) वाचता आले पाहिजे, जे सावरकरांच्या पत्रावर आक्षेप घेतात ते एकतर ‘दोन ओळींमधील’ वाचण्यास सक्षम नसतात किंवा ‘दोन ओळींमधील’ वाचण्याची त्यांची तयारीच नसते. सावरकरांच्या ह्या अटी, ही आवेदनपत्रे, ह्यामागील राजकीय खेळी, मनोभूमिका स्वत: सावरकरांनी कधीही लपवून ठेवली नाहीत. सावरकरांचे आत्मचरित्र ‘माझी जन्मठेप’ मध्ये ह्या सर्वाचा सांगोपांग उहापोह केलेला आहे.

व्हिएतनामच्या कम्युनिस्ट ‘हो-चि-मिन्ह’नेसुद्धा चीनच्या कोमिंग्टांग कारागृहातून अशाच प्रकारचे पत्र व सहकार्याची अट मान्य करून सुटका करून घेतली होती. मार्शल चँगला त्याने कोमिंग्टांग शासनाच्या आधाराने इंडोचायनात स्थापन झालेल्या ‘डाँग-मिन्ह-होई’ (जी ‘हो-चि-मिन्ह’च्या ‘व्हिएत-मिन्ह’ला शह देण्यासाठी स्थापिली होती) या संघटनेचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली व सुटका करून घेतली. (कानिटकर, वि. ग., व्हिएतनाम: अर्थ आणि अनर्थ, मनोरमा प्रकाशन १९९८, पृष्ठ ५३) तसेच रशियाने जेव्हा जर्मनीशी केलेला अनाक्रमणाचा करार संपुष्टात आल्यावर मित्र राष्ट्रांशी हातमिळवणी केली, तेव्हा एका रात्रीत कम्युनिस्टांनी आपली निष्ठा बदलली. म्हणजे विरोधक करतील ती राजकीय खेळी व सावरकर करतील तो द्रोह? तात्पर्य हेच की ‘झोपलेल्याला उठवता येते पण झोपेचे सोंग घेणाऱ्याला उठवता येत नाही.’

अक्षय जोग

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *