‘तम सौता तमारे जीवनमं, दिवा लगा सको छो ।
सौतर वळख सौता करलीजो, नरेर नारायण बनं जायो ।।’
‘तुम्ही स्वतः तुमचं आयुष्य प्रकाशमान करू शकता. स्वतःतील शक्ती, ऊर्जा, क्षमतांची ओळख करून घ्या आणि नराचे नारायण व्हा’, असा संदेश साध्या सोप्या बोलीभाषेत देत, भारत भ्रमण करणाऱ्या क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांची आज 283 वी जयंती आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशाबरोबरच संपूर्ण भारतभर आणि भारताबाहेरही पसरलेल्या शूरवीर बंजारा समाजामध्ये सेवालाल महाराज यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुठी तालुक्यातील गोलालडोडी गावात झाला. आता हे गाव सेवागड या नावाने ओळखले जाते. सेवालाल यांच्या आईचे नाव धरमणी, तर वडिलांचे नाव भीमा नाईक होते. सेवा, बद्दू, हप्पा, भाणा अशी ही चार भावंडं. त्यातील सेवा हे थोरले होते. त्या काळी बैलांच्या पाठीवर अन्नधान्याच्या आणि मीठाच्या गोणी लादून हा समाज गावोगावी व्यापार करत भटकत असे. इतर अनेक समाजगटांप्रमाणेच बंजारा समाजातही तेव्हा शिक्षणाचे प्रमाण कमी होते. अंधश्रद्धा, देवभोळेपणा अधिक होता. व्यापाराच्या निमित्ताने वडिलांबरोबर भारतभर फिरताना सेवालाल यांना समाजातील अनिष्ट परंपरा, जाचक रुढी यांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. त्या बदलण्यासाठी त्यांनी समाजबांधवांना गोर (गोरमाटी) या बोलीभाषेतून उपदेश करायला सुरवात केली.
‘चोरी लबाडीरो धन घरेमं मत लावजो ।’
म्हणजेच व्यापार करताना चोरी, लबाडी करून संपत्ती कमवू नका.
‘कोई केनी भजो पूजो मत । भजे पूजेमं वेळ घालो मत ।।’
कोणत्याही मूर्तीची पूजाअर्चा करण्यात आणि भजन-पूजनात वेळ घालवू नका. (कारण खरा देव तर माणसांतच आहे.)
‘जाणजो, छाणजो, पछच मानजो ।’
जाणून घ्या, समजून घ्या आणि मगच मान्य करा.
ही त्यांची शिकवण ऐकून हळुहळू बंजारा समाज त्यांच्याभोवती जमा होऊ लागला. एकत्र येणाऱ्या या समाजाला संत सेवालाल यांनी अत्याचारी निजामाविरुद्ध लढा उभारण्यासाठी सिद्ध केले. पुढे दिल्ली येथे बंजारा समाजाची एक मोठी पंचायत त्यांनी भरवली. विविध राज्यांमधील बंजारा समाजाबरोबरच इतर अनेक लोकही या पंचायतीला उपस्थित होते. त्या वेळी त्यांनी उत्स्फूर्तपणे अनेक अभंग आणि लोकगीतांची रचना केली. त्यातून समाजाचे मोठ्या प्रमाणावर प्रबोधन झाले. ‘दारू पिऊ नका. स्त्रियांचा आदर करा; त्यांना कुटुंबात अधिकार द्या. कोंबड्या-बकऱ्यांचा बळी देऊ नका’, असा संदेश देणाऱ्या अनेक रचना त्यांनी केल्या. सेवालाल यांचे हे साहित्य बोलीभाषेत असल्याने आणि गोरमाटी भाषेला लिपी नसल्याने ते बऱ्याच उशिरा प्रकाशात आले. आज दोनशे वर्षांनंतरही त्यांची शिकवण बहुसंख्य बंजारा समाजाला मुखोद्गत आहे. त्यांना अतिशय आदराने व प्रेमाने ‘सेवामाया’ असे आता संबोधले जाते.
संत सेवालाल यांनी 2 जानेवारी 1806 रोजी रुईगड (ता. दिग्रस, जि. यवतमाळ) येथे समाधी घेतली.
‘शिका छ, शिकवा छ । शिकण राज घडवा छ ।।’ (स्वतः शिका, इतरांना शिकवा आणि शिकून राज्य घडवा.) हा संत सेवामायांचा संदेश शिरोधार्य मानून बंजारा समाज खूप मोठ्या प्रमाणात सुशिक्षित होऊन आज विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. मात्र, आजवर ज्यांना शिक्षणाची संधी मिळाली नाही, अशा मुलांसाठी भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून पालावरच्या शाळा चालवल्या जात आहेत.
‘नरेर नारायण बनं जायो ।’ महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. या संतांना एखाद्या विशिष्ट समाजाच्या चौकटीत अडकवून न ठेवता त्यांची शिकवण आपण अंगीकारली पाहिजे. तरच आपला समाज एकसंध आणि समरस होऊ शकतो. त्यासाठी आपण आपल्या आचरणात बदल केला पाहिजे. असे घडले, तर नराचा नारायण होणे दूर नाही. आज संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण असा एखादा संकल्प केला पाहिजे.
संत सेवालाल महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
– सौ. शुभांगी संजय तांबट
सौजन्य – विश्व संवाद केंद्र , पुणे.