पुणे-पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या एका कंटेनरने पुढे जाणाऱ्या चार ते पाच वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यु झाला तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस आणि बचाव कार्य पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
या अपघातात नवी मुंबई येथील डॉ.वैभव वसंत झुंझारे (वय-41), उषा वसंत झुंझारे (63), वैशाली वैभव झुंझारे (38), श्रिया वैभव झुंझारे (5) आणि मंजू प्रकाश नाहर (58,रा.गाेरेगाव, मुंबई ) यांच्यासह अपघातग्रस्त ट्रकचालक अशा सहाजणांचा मृत्यु झाला आहे. तर, प्रकाश हेमराज नाहर (65,रा.गोरेगाव, मुंबई ), स्वपनील सोनाजी कांबळे (30,रा.गोरेगाव), अर्णव वैभव झुंझारे (11) काळुराम जमनाजी जाट आणि किशन चौधरी (रा.मुंबई ) हे जखमी झाले असून त्यांच्यावर खोपोली येथील नगर परिषदेच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
मंगळवारी मध्यरात्री 12 वाजून 40 मिनिटांनी पुणे मुंबई महामार्गावरुन ट्रक (आरजे51- जीबी2238) हा भरधाव वेगात जात होता. त्याचवेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक उतारावर वेगाने जाऊन त्याने पुढे जाणाऱ्या टेम्पोला (टीएन 99 डी 6870)ला जोरदार धडक दिली. त्यानंतर टेम्पो दोन्ही लेनच्या मध्यभागी खोदलेल्या जागेत उलटा फिरुन अडकून राहिला. त्यानंतर ट्रकने पुढे चालणारी इनोव्हा कार (एमएच 12- एलएक्स4599) हिला व हुंदार्इ क्रेटा कार या दोन्ही कारला जोरात धडक दिली. त्यामुळे या दोन्ही कार पलटी होवून बाजूला फेकल्या गेल्याने इनोव्हा कारमधील चालक व दोन महिला अशा तीन जणांचा मृत्यू झाला तर दोन मुले गंभीर जखमी झाले. तसेच क्रेटा कारमधील एका महिलेचा व चालक व बाजूस बसलेला इसम गंभीर जखमी झाले. त्यानंतर ट्रकने पुढे जाऊन अशोक लेलंड टेम्पो (एमएच 14, जीडी 3880) यास पाठीमागून जोरदार ठोकर मारुन रस्त्यावर टेम्पोसह रस्त्याच्या मध्यभागी खोदलेल्या ठिकाणी पलटी होवून अपघात झाला. यामध्ये अपघातात ट्रकचालक हा सुध्दा मयत झाला आहे. अशाप्रकारे सदर अपघातात सहाजण ठार तर पाचजण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन ठप्प झालेली वाहतूक सुरळित करण्यासाठी पोलीसांनी प्रयत्न केले.
कोरोनात वाचवले, अपघातात गमवाले
डॉ. वैभव झुंझारे हे नवी मुंबई महानगरपालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी आहेत. कोरोना काळात त्यांच्यावर कोरोना नियंत्रणाची जबाबदारी असल्याने त्यांनी सुरक्षेस्तव स्वत:चे आईवडील , पत्नी व मुलांना मुळगावी ठेवले होते. खासगी कारने ते गावावरुन सर्वांना घेऊन पुन्हा नवी मुंबर्इला येत असतानाच मंगळवारी मध्यरात्री द्रुतगती महामार्गावर त्यांचे कारला कंटनेरने धडक दिली आणि त्यांचे कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यु झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे.