PMC Election -पुण्यात आगामी पुणे महानगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडी म्हणूनच लढणार असून, महायुतीतील कोणत्याही घटक पक्षासोबत उघड किंवा छुपी युती किंवा महाआघाडी होणार नाही, असा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि स्पष्ट निर्णय आज पक्षाच्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
मंगळवारी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाची मासिक कार्यकारणी पार पडली. याच दिवशी पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची आरक्षण सोडतही संपन्न झाली. पक्षाचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे आणि आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासह पक्षाचे स्थानिक नेते उपस्थित होते.
‘पुण्याच्या वाटोळ्याला महायुती जबाबदार’
महायुतीसोबत युती न करण्यामागील कारण स्पष्ट करताना प्रशांत जगताप महायुतीवर निशाणा साधला. त्यांचे थेट म्हणणे आहे की, “पुणे शहराच्या वाटोळ्याला महायुती जबाबदार आहे”. गेल्या पाच वर्षांत ज्यांनी पुणे महानगरपालिकेचा कारभार ‘बट्ट्यामुळे’ केला, त्यांच्या पापाच्या वाटाण्यात आम्ही कशाला जाऊ, असा सवाल जगताप यांनी उपस्थित केला आहे. पुणेकरांनी गेल्या काळात शहरातील रस्त्यांची अवस्था, वाहतुकीची स्थिती आणि महानगरपालिकेतील भ्रष्टाचार जवळून पाहिला आहे. प्रशासकाचा कारभार नावाला होता, परंतु पडद्याआडून भारतीय जनता पक्षाचे नेतेच तो कारभार चालवत होते, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे, “पुण्याने महायुतीमुळे काय काय गमावलंय” हाच आपला येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीचा मुख्य मुद्दा असेल, असे त्यांनी सांगितले.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती नाही
काही ठिकाणी वेगवेगळ्या नगर पालिकांमध्ये भिन्न विचारांचे पक्ष एकत्रित येत असल्याच्या चर्चा आहेत, पण पुणे शहरात तसा कोणताही निर्णय होणार नाही. कोल्हापूरमध्ये जसे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले, तसे पुण्यात होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
अजित दादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष महायुतीतील एक घटक पक्ष आहे. त्यामुळे महायुतीतल्या कुठल्याच पक्षासोबत जाण्याचा आमचा काल, आज किंवा उद्याही मानस नाही. आम्ही राज्यातला एक पुरोगामी पक्ष म्हणून पुणे शहरात महाविकास आघाडी म्हणूनच लढू आणि पक्षाची ओरिजनल विचारधारा कायम ठेवू, असे त्यांनी स्पष्ट केले.
निर्णयाचा अधिकार पक्षाध्यक्षांना, पण स्थानिक नेतृत्वाला सूट
हा निर्णय अंतिम आहे का? जगताप म्हाणाले, या प्रश्नावर बोलताना, या सर्व गोष्टींचा अंतिम अधिकार आदरणीय पवार साहेबांना आहे, हे मान्य करण्यात आले. मात्र, पवार साहेबांनी या शहरातील निर्णय घेण्याचा अधिकार इथल्या सर्व वरिष्ठ नेत्यांना दिलेला आहे. त्यामुळे महायुतीतील पक्षासोबत आतली किंवा बाहेरची युती-आघाडी आहे, असे चित्र पुणेकरांना दिसणार नाही, हा पुणेकरांना शब्द आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.
महाविकास आघाडीची तयारी अंतिम टप्प्यात
महाविकास आघाडीच्या अनुषंगाने बैठका सुरू आहेत. काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव साहेबांचा पक्ष) यांच्यासोबत एक बैठक संपन्न झालेली आहे. आरक्षणावर अवलंबून असलेली अंतिम बैठक आता आरक्षण सोडत झाल्यामुळे येत्या १० ते १५ दिवसांमध्ये पूर्ण होईल, आणि तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुकीकडे जाण्यासाठी सज्ज राहतील असे जगताप यांनी सांगितले.
मनसे आणि इनकमिंगवर भूमिका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत (मनसे) राज्य पातळीवर जो निर्णय होईल, त्यावर पक्षाचे धोरण अवलंबून राहील. पुण्यात काँग्रेससारख्या नैसर्गिक सविचारी पक्षांना विचारात घेऊनच त्या संदर्भामध्ये निर्णय घेतला जाईल.
दरम्यान, भाजपकडून आणि शिवसेनेत रोज मोठे इनकमिंग होत असल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष) नेही लवकरच मोठी राजकीय इन्कमिंग होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. कमीत कमी २५ एक लोक आमच्याकडे येतील, पण कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे जगताप यांनी सांगितले. २०२६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुण्यात चांगला महापौर देईल, असा विश्वास पक्षाच्या त्यांनी व्यक्त केला.














