पुण्यात होणाऱ्या ३२ व्या पीएसपीबी इंटर युनिट बुद्धिबळ स्पर्धेत २२ ग्रँडमास्टर्स, ६ महिला ग्रँडमास्टर्सचा सहभाग


पुणे : येत्या ८ ते १२ मार्च दरम्यान इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल)च्या वतीने पुण्यात होणाऱ्या ३२ व्या पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड इंटर युनिट बुद्धिबळ स्पर्धेत २२ ग्रँडमास्टर्स, ६ महिला ग्रँडमास्टर्स सहभागी होणार असून पीवायसी हिंदु जिमखाना या ठिकाणी सदर स्पर्धा संपन्न होणार असल्याची माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पश्चिम विभागाचे मुख्य सरव्यवस्थापक अजित धाकरस यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. एका दशकानंतर पुन्हा यावर्षी पुणे शहरात सदर स्पर्धेचे आयोजन होत असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड’चे  उपसचिव जसजीत सिंग, आयओसीएलच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स विभागाचे सहाय्यक  सरव्यवस्थापक सुरेश अय्यर, आयओसीएलच्या क्रीडा विभागाचे सहाय्यक सरव्यवस्थापक भालचंद्र जोगळेकर, ग्रँडमास्टर व आयओसीएलच्या क्रीडा विभागाच्या मुख्य व्यवस्थापक अभिजित कुंटे, ग्रँडमास्टर्स विदित गुजराथी, कोनेरू हम्पी, बी अधिबान, रौनक साधवानी आणि महिला ग्रँडमास्टर सौम्या स्वामीनाथन आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  धोकादायक नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई करावी :छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांची मागणी

स्पर्धेसाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संघाला अग्रमानांकन देण्यात आले असून, दुसरे व तिसरे मानांकन हे अनुक्रमे ओएनजीसी व बीपीसीएल यांच्या संघांना देण्यात आले आहे. वैयक्तिक प्रकारात विदित गुजराथी याला पहिले मानांकन मिळाले असून, आर. प्रज्ञानंद याला दुसरे तर एस.पी. सेतूरामन यांना तिसरे मानांकन देण्यात आले आहे.

‘रॅपिड’ सामन्यांचा समावेश असलेली ही स्पर्धा लीग कम नॉकआऊट फॉरमॅटनुसार सांघिक आणि वैयक्तिक अशा दोन विभागात खेळविली जाणार असल्याचे सांगत ग्रँडमास्टर अभिजित कुंटे म्हणाले, “स्पर्धेअंतर्गत होणारे सांघिक सामने हे ८ ते १० मार्च दरम्यान सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत तर वैयक्तिक स्पर्धा विभागात होणारे सामने ११ व १२ मार्च दरम्यान सकाळी ९ ते सायं ४ दरम्यान पीवायसी हिंदु जिमखाना येथे संपन्न होतील.”

अधिक वाचा  माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची तब्बल सहा तास चौकशी

देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांचे १४ संघ या स्पर्धेत विजेतेपदासाठी एकमेकांसमोर असतील. यांपैकी काही कंपन्यांचे दोन संघ देखील स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर रौनक साधवानी, ग्रँडमास्टर डी हरिका, महिला ग्रँडमास्टर ईशा करवदे, ग्रँडमास्टर सूर्य शेखर गांगुली, महिला ग्रँडमास्टर सौम्या स्वामिनाथन, ग्रँडमास्टर मुरली कार्तिकेयन, ग्रँडमास्टर एम आर ललिथ बाबू (सर्व जण आयओसीएल) ग्रँडमास्टर एस पी सेतूरामन, ग्रँडमास्टर दिप्तीयान घोष (दोघेही ओएनजीसी), ग्रँडमास्टर अभिजित गुप्ता, ग्रँडमास्टर जी एन गोपाल (दोघेही बीपीसीएल) यांसारखे ग्रँडमास्टर्स सहभागी असणार आहेत.

या वर्षीच्या स्पर्धेत आयओसीएलच्या वतीने ८ ग्रँडमास्टर्स, ओएनजीसीच्या वतीने ९ ग्रँडमास्टर्स तर बीपीसीएलच्या वतीने ५ ग्रँडमास्टर्स सहभागी होतील तर ६ महिला ग्रँडमास्टर्सपैकी ५ ग्रँडमास्टर्स या आयओसीएलच्या वतीने तर १ ऑईल इंडिया लिमिटेडच्या वतीने स्पर्धेत सहभाही होणार असल्याचेही ग्रँडमास्टर अभिजित कुंटे म्हणाले.

अधिक वाचा  वडगाव शेरीत मोहोळांसाठी ‘डबल इंजिन’ : मुळीक बंधू सक्रिय

याप्रसंगी बोलताना विदित गुजराथी आणि कोनेरू हम्पी यांनी भारतातील अनेक ग्रँडमास्टर्सचा समावेश असणारी ही स्पर्धा एक आव्हानात्मक  पण तितकीच विलक्षण असल्याचे सांगितले. तर आयओसीएल कंपनीने खेळासाठी व खेळाडूंसाठी  घेतलेल्या या पुढाकारामुळे मला आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत झाली व त्यामुळेच मी खेळावर आपले लक्ष केंद्रित करून जागतिक स्तरावर चांगली कामगिरी करू शकले, अशी भावना सौम्या स्वामीनाथन हिने यावेळी व्यक्त केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love