पुणे – हिंदू आध्यात्मिक सेवा फाऊंडेशनच्या (एचएसएसएफ) नेतृत्वात पुणे महानगरातील विविध संस्था संघटनांतर्फे रविवारी (२९ ऑगस्ट २०२१) प्रकृती वंदन दिन साजरा करण्यात आला.
चराचर सृष्टीतील प्रत्येक घटक हा तितकाच महत्त्वाचा आहे. आणि कोरोनाचा या महामारीत मानवाला ऑक्सिजनचे, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधिक गंभीरतेने कळाले. असा सूर विविध मान्यवरांनी या कार्यक्रमांदरम्यान व्यक्त केलेल्या मनोगतामधून समोर आला.
पुणे महानगरात प्रकृती वंदनाचा मुख्य कार्यक्रम इस्कॉन मंदिर, कोंढवा येथे झाला. याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह महेशराव करपे, इस्कॉन संजय भोसले, हिंदु आध्यात्मिक सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीपभाई मेहता, गुरुद्वारा अध्यक्ष चरंजितसिंग सहानी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष जगदेवरावजी उराव यांच्या व पंढरपूर वारी मार्गावरील वृक्षारोपण या विषयावरील वृक्षदिंडी या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने इस्कॉन येथे १२ हजार ५०० तुळशी रोपांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पुणे शहर हे राहण्यासाठी जसे आवडते महानगर आहे तसेच ऑक्सिजनचे शहर म्हणून याची ओळख तयार व्हावी. यासाठी हिंदू आध्यात्मिक सेवा फाऊंडेशन व पुणे महानगरपालिकेने एकत्रित मिळून या क्षेत्रात कार्य केल्यास निश्चितपणे ही ओळख आपल्याला मिळविता येईल. यावेळी वृक्ष संवर्धन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांचा सन्मान करण्यात आला व गोमातेचे पूजनही करण्यात आले.सूत्रसंचालन किशोर येनपुरे कार्यवाह यांनी केले.
या प्रकृती वंदन दिनाच्यानिमित्ताने आयोजित इतर कार्यक्रमांमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या वतीने लेफ्टनंट कर्नल राजीव चौधरी यांचा हस्ते १०० गुळवेल रोपांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी महेशजी सूर्यवंशी, सुनीलजी रासने उपस्थित होते.
तसेच पुणे महानगरातील मानाचे पाचही गणपती मंडळांचे पदाधिकारी, भाऊ रंगारी, अखिल मंडई मंडळ, त्वष्टा कासार मंडळ, निंबाळकर तालीम मंडळ, जिलब्या मारुती मंडळ यांनीही वृक्ष वाटप व वृक्षपूजनाचा कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
तर पुणे शहर भाजप महिला आघाडीच्या वतीने मुठा नदीची ओटी भरली व पूजन याप्रसंगी नगरसेविका अर्चनाताई पाटील यांनी संयोजन केले. यावेळी दीपक नागपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर संजय माने कुटुंबाच्या वतीने वराह पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
दादावाडी मंदिर, शत्रुंजय मंदिर, अपंग कल्याणकारी संस्था, सिंहगड ट्रेकर्स, संतोषी माता मंदिर कात्रज, देवदेवेश्वर संस्था सर्व मंदिरे, MIT कॉलेज, महर्षी कर्वे संस्था, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, शिक्षण प्रसारक मंडळी, ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आळंदी, ध्यास फाऊंडेशन, करुणा सेवा मंदिर, स्वामीनारायण मंदिर, श्रुत फौंडेशन, चिरंजीवी योग सेंटर, महाअवतार बाबाजी मठ, नांदेड सिटी आदी मंडळ व संस्थातर्फे देखील वृक्षपुजन कार्यक्रमांचे आयोजन प्रकृती दिनाच्या निमित्ताने केले होते.
यासर्व कार्यक्रमांचासाठीचा समन्वय व नियोजन हिंदू आध्यात्मिक सेवा फाऊंडेशन, पुणे महानगराचे कार्यवाह किशोर येनपुरे, अशोक गुंदेचा, प्रशांत महामुनी, सुभाष परमार, रवीकिरण नांदखिले, योगेश भोसले, सिद्धार्थ पारखे, प्रसाद दगडे, दिलीप हुडके, सुनंदाताई राठी, किर्तीताई कोल्हटकर, पुनमताई मेहता यांच्या नेतृत्वातील समितीने यशस्वीपणे केले.