चांगली कविता माणसाला खेचूनच घेते : कवी वैभव जोशी

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- “अनेक प्रश्न या पिढीसमोर आहेत. सध्याच्या काळाचं प्रतिबिंब या कवितांमधून वाचायला मिळतं, त्यामुळे चांगली कविता माणसाला खेचूनच घेते.” असे उद्गार प्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांनी काढले.

तनया गाडगीळ लिखित ‘विवश’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.  

“संपूर्ण पुस्तक वाचत असताना विचारांमधील प्रगल्भता अचंबित करणारी आहे.  कॅलिडोस्कोप सारखी या काव्यसंग्रहातील कविता परत परत वाचताना दरवेळी वेगळं काहीतरी दाखवते. विचारांमधला ठामपणा, प्रामाणिकपणा, अंधाराची स्वीकृती या कवितांमधून जाणवते. अलीकडच्या काळातलं वाचलेलं हे चांगलं पुस्तक आहे आणि म्हणूनच ही कविता नक्की टिकेल असं मला वाटतं.” असेही मत वैभव जोशी यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

कवयित्री तनया गाडगीळ याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, “नकारात्मक भावनांनाही एक मानाचे स्थान असावे. घटना आणि भावनांची कोंडी होते त्यावेळी जाणवतं की आपण अनेक वेळा हतबल असतो. अश्रू आणि विचारांचा गुंता यातूनच जन्माला आली आहे ही कविता.”

तारांगण प्रकाशनातर्फे विवश हा कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. तारांगण प्रकाशनाचे मंदार जोशी याप्रसंगी बोलताना म्हणाले, “उत्तम कवयित्रीचं पहिलं लक्षण म्हणजे भावनाशील असणं. चांगल्या कवितेची अनेक वैशिष्ट्ये या काव्यसंग्रहात अनुभवायला मिळतात.”

 विवश या कवितासंग्रहाच्या छोटेखानी प्रकाशन समारंभास रसिक साहित्यचे शैलेश नांदुरकर आणि संवाद पुणे चे सुनील महाजन उपस्थित होते. प्रकाशन समारंभाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन रोहन गाडगीळ यांनी केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *