पुणे —महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरिब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा, अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावं लागेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब (balasaheb Ambedkar)आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. गेल्या आठवड्यात याची सुनावणी झाली. त्यावेळी न्यायाधीशांनी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असून त्याची पुढील सुनावणी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठा (बेंच) कडे दिली आहे. त्यामुळे मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाला तात्पुरती का होईना स्थगिती मिळाल्याने मराठा समाजात नाराजीचे वातावरण आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राजकारण केले जात असल्याचे बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.