पुणे—जे विद्यार्थी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन ते अधिकारी झाले आहेत त्यांना तात्काळ नियुक्तीपत्रं द्या, नाहीतर आम्ही मुंबईत तीव्र आंदोलन करू, असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. दरम्यान, परीक्षा जूनमध्ये झाली, नियुक्ती पत्रं अजून दिली नाहीत. सरकार नऊ महिन्यांपासून झोपा काढत आहे का? वेळीच नियुक्तीपत्रं दिलं तर विद्यार्थी कशाला आंदोलन करतील? असा सवाल त्यांनी केला.
एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परंतु नियुक्ती न झालेल्या विद्यार्थ्यांची पत्रकार परिषद शनिवारी झाली. त्यावेळी पडळकर बोलत होते. जूनमध्ये झालेल्या परीक्षेचं नियुक्तीपत्रं देण्याने कोरोना नियमांचा फज्जा कसा उडेल?, असा सवालही त्यांनी राज्य सरकारला केला.
महाराष्ट्र सरकार पोलिसांना पुढे करून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन मोडीत काढत आहे. परवाही पोलिसांना पुढे करून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन मोडीत काढलं. आजही काही ठरावीक विद्यार्थी नियुक्तीपत्रं मिळावं य मागणीसाठी आंदोलन करत होते. पण कोरोनाचं कारण देऊन या विद्यार्थ्यांवर दबाव वाढवण्यात आला, असा आरोप पडळकर यांनी केला.
केवळ 413 विद्यार्थांना नियुक्तीपत्रं द्यायचं आहे. त्यासाठी कोरोनाचं कारण देण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांना केवळ नियुक्तीपत्रं देण्यात येत आहे. नियुक्तीपत्रं दिल्याने कोरोना नियमांचा असा कोणता फज्जा उडणार आहे?, असा सवालही त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अधिकाऱ्यांची सर्वात मोठी भरती झाली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार गंभीर नाही. या सरकारने आरक्षणाचा सर्व घोळ करून ठेवला आहे, अशी टीकाही त्यांनी केली. 79 मराठा मुलं सर्वसाधारण वर्गातून सिलेक्ट झाली आहेत. त्यांच्यावर अन्याय का? इतर वर्गातील मुलांवर अन्याय का? सरकारने या सर्वांना तातडीने नियुक्तीपत्रं द्यावीत, अशी माझी मागणी आहे, असंही ते म्हणाले.