पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघ महायुतीचे लोकप्रिय उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा शनिवार दि ११ मे रोजी सकाळी १० वाजता शुक्रवार पेठ येथील नातूबाग मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांनी याबद्दलची माहिती दिली.
पुणे शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून नितीन गडकरी यांनी हजारो कोटींचा निधी आजवर दिलेला आहे. शहराच्या विकासावर त्यांनी कायम विशेष लक्ष दिल्याने आज अनेक प्रकल्प निर्माण झाले आहेत. भविष्यात देखील केंद्र सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार येणार हे देशवासीयांनी ठरवलेलं आहे. पुणेकर नागरिकांचा देखील भाजपाच्या मागे राहण्याचा ठाम विश्वास आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने नितीन गडकरी यांची पहिलीच सभा कसबा मतदारसंघात आयोजित करण्यात आली असून यावेळी त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळणार असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे हेमंत रासने यांनी सांगितले .
पुणे लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान पार पडणार असून 11 मे ला प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी यंदा पुण्याचे लोकप्रिय महापौर ठरलेले मुरलीधर मोहोळ यांना भारतीय जनता पार्टीकडून लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आल आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहोळ यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. तर १० मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही जाहीर सभेचे आयोजन पुण्यामध्ये करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आणखीन प्रमुख नेत्यांच्या सभांचे आयोजन शेवटच्या टप्यात महायुतीकडून करण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.