पुणे- ‘आई माझी काळूबाई’ ही मालिका चित्रीकरण पूर्ण होण्याआधीच गाजते आहे. या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि या मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. अलका कुबल यांनी प्राजक्तावर गंभीर आरोप केल्यानंतर प्राजक्ताने या मालिकेतून मला काढलं नाही तर, मीच मालिका सोडल्याचं स्पष्ट केलं आहे. मला सेटवर सहकारी कलाकार विवेक सांगळे यांच्याकडून शिवीगाळ झाली, माझ्या आईबद्दल अपशब्द काढले गेले, तुमच्या मुलींसोबत असे काही झाले असते तर अलका ताई अशाच वागल्या असता का ? असा सवाल प्राजक्ताने केला आहे. अलकाताई माझ्यासाठी आई सारख्या आहेत, मात्र त्या नराधमांना पाठीशी घालताहेत. माझी बदनामी करताहेत असा आरोपही प्राजक्ताने केला.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेलया वार्तालाप कार्यक्रमात प्राजक्ता बोलत होती. यावेळी पत्रकार संघयच अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, उपाध्यक्ष सुकृत मोकाशी हे उपस्थित होते.
प्राजक्ता म्हणाली, मला मालिकेतून काढले नाही, मीच मालिका सोडली कारण मला सेटवर विवेक सांगळे यांच्याकडून शिवीगाळ झाली. माझ्या आईबद्दल अपशब्द काढले गेले. मी परीक्षेसाठी सुटी घेणार हे प्रोजेक्ट सुरू झाला त्यावेळीच सांगितले होते. तरीही माझ्यामुळे शो थांबेल म्हणून मी परिक्षाही दिली नाही. मी इव्हेंट ची सुपारी घेते असा आरोप झाला त्यात तथ्य नाही. कोरोनामुळे इव्हेंट बंद असताना मला कोण बोलवणार आहे?
मालिकेत मला तोकडे कपडे घालण्याचे काही प्रसंग होते, त्याला माझा विरोध होता. मला रक्त लागलेली साडी दिली गेली, माझ्या आईने त्याविषयी विचारले तर त्याला माझ्या आईचा हस्तक्षेप म्हटलं गेलं. अलका ताई माझ्या साठी आई सारख्या आहेत, मात्र त्या नराधमांना पाठीशी घालताहेत. माझी बदनामी करताहेत असे ती म्हणाली.
मला या सिरीयल च आतापर्यंत एकही दिवसाचे पेमेंट झालेले नाही. एका सामान्य घरातील मुलगी आहे. माझे वडील 8- 8 / 10-10 तास करतात तेव्हा आमच्या घरात चूल पेटते, असं असताना मला एकही रुपया मिळालेला नाही. उलट मला बदनाम केलं जातं असल्याचा आरोप प्राजक्ताने केला.
दरम्यान, संभाजी राजांची भूमिका केलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांच्याप्रमाणे राजकारणात जायचं विचार आहे का असे विचारले असता प्राजक्ता म्हणाली, अजून तरी मी राजकारणात जाण्याचा विचार केलेला नाही. मी जे काही करते ते मनापासून, प्रामाणिक पणे करते. फक्त मालिका, चित्रपट किंवा वेब सिरिजच करायच्या असं मी ठरवलेलं नाही. मला रंगभूमी वर नाटकही करायला आवडेल. मी जे काही करेल ते समरसून करेन.