पुणे(प्रतिनिधी)– मोदी सरकार हाय हाय; धिक्कार असो, धिक्कार असो, भाजप सरकारचा असो, अशा घोषणा देत शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट मार्गिका सुरू करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शिवाजीनगर न्यायालय येथे शुक्रवारी जोरदार आंदोलन करण्यात आले. या वेळी आघाडी व युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली. एकीकडे श्रेयवादामध्ये अडकून पडलेल्या स्वारगेट ते शिवाजीनगर न्यायालय या भुयारी मेट्रोचे महाविकास आघाडीच्या वतीने उद्घाटन करण्यात आले. तर 29 सप्टेंबर रोजी या मार्गाचे ऑनलाईन उद्घाटन करून सेवेचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे मेट्रोकडून सांगण्यात आले.
स्वारगेट ते शिवाजीनगर न्यायालय मेट्रो मार्गिका अनेक दिवसांपासून लोकार्पणासाठी सज्ज आहे. पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्याकरिता ही मेट्रो मार्गिका तयार असूनही जनतेसाठी खुली करण्यात आलेली नाही. पावसाचे कारण देत गुरुवारी पंतप्रधानांनी लोकार्पण सोहळा पुढे ढकलला. त्यामुळे स्वारगेट मार्गिकेसाठीची प्रतीक्षा कायम राहिली. या पार्श्वभूमीवर काँग्रेस, ठाकरेसेना व शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरले. आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत व घोषणाबाजी करीत मेट्रोच्या शिवाजीनगर न्यायालय स्टेशनला धडक दिली. तेथे जोरदार आंदोलन करण्यात आले. दरम्यान, युतीच्या कार्यकर्त्यांनीही या वेळी आंदोलकांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यातून दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जुंपली. परस्परांना हे कार्यकर्ते भिडले.
इव्हेंटबाजीचा हव्यास पुणेकरांच्या हिताच्या आड आला. जिथे सभा होणार होती त्या मैदानावर चिखल असल्याने नरेंद्र मोदींची भाषण ठोकण्याची संधी हुकली म्हणून संपूर्ण उद्घाटन कार्यक्रम रद्द करण्यात आला. हा समस्त पुणेकरांचा अपमान असल्याची तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहरचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन
जनतेच्या पैशातून निर्माण झालेली मेट्रो मार्गिका कोणा एका व्यक्तीच्या हट्टापायी वापराविना पडून राहणे योग्य नाही. जनतेचा हितासाठी महाविकास आघाडीच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते फीत कापून या मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन करण्यात आल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले. आमदार रविंद्र धंगेकर, काँग्रेसचे शहराध्यरक्ष अरविंद शिंदे, मोहन जोशी, संजय मोरे, गजानन थरकुडे, संगीता तिवारी, आशा साने, उदय महाले, अजित दरेकर, किशोर कांबळे, दिलशाद आत्तार, रमीज सय्यद यांच्यासह अन्य नेत्यांनी यात सहभाग घेतला.












