पुणे – हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते. आपण सर्व हिंदूच आहोत, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. भागवत यांच्या या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भागवतांच्या विधानाने माझ्या ज्ञानात भर पडली, असा खोचक टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लगावला.
हन भागवत यांनी एका कार्यक्रमात हिंदू असो वा मुस्लिम आपले पूर्वज एकच असल्याचं म्हटलं आहे. प्रत्येक भारतीय हा हिंदू आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातील विद्वानांनी कट्टरपंथीयांविरोधात उभं राहिलं पाहिजे, असं ते म्हणाले होते. तसेच ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये मतभेद निर्माण करून त्यांच्यात भांडणं लावली. मुस्लिम कट्टरपंथीय असल्याचं हिंदूंना सांगून ब्रिटिशांनी भांडणं लावली. त्यातच दोन्ही समाजात एकमेकांवर विश्वास राहिला नाही. त्यामुळे त्यांनी कधीच एकमेकांसमोर आपलं म्हणणं मांडलं नाही. म्हणून दोन्ही समाजात अंतर निर्माण झालं. आता आपण आपला दृष्टीकोण बदलला पाहिजे, असं भागवत म्हणाले होते.
लोकशाहीमध्ये अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीशी संपर्क ठेवणं यात गैर नाही
मी अनेक वर्षे सत्तेत आणि विरोधात होतो. फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा सर्व अधिकारी मलाही भेटत होते. मी एखादी गोष्ट सांगितली. ती योग्य असेल तर ते नाही म्हणायचे नाही. लोकशाहीमध्ये अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीशी संपर्क ठेवणं यात गैर नाही. पण अधिकाऱ्यांचा गैरवापर होत असेल तर ते चुकीचं आहे. अधिकारी माजी मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षांना भेटले तर त्यात गैर नाही. उद्या पृथ्वीराज चव्हाणांना भेटले तरीही गैर नाही, त्याची चिंता करण्याची गरज नाही. अधिकारी सर्व काही व्यवस्थित ओळखत असतात. त्यांना सर्व समजतं. केव्हा, कधी, कशा पद्धतीने पावलं टाकावी, हे अधिकाऱ्यांना समजतं, असं ते म्हणाले.
गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांना जाणार नाही
काल मी जुन्नरला गेलो होतो. ज्यांनी कार्यक्रम घेतला त्यांच्याकडून आधी सर्व माहिती घेतली होती. सरकारची परवानगी घेतली का? पोलीसांची परवानगी घेतली का? आरोग्य खात्याची परवानगी घेतली का? खुर्च्यांमध्ये अंतर ठेवले का? आदी माहिती त्यांच्याकडून घेतली. त्यांनी होकार दिल्यानंतरच मी कार्यक्रमाला गेलो. पण तिथे गेल्यावर व्यासपीठावर अतंर होतं. पण समोर लोक शेजारीशेजारी बसले होते. ते योग्य नव्हतं, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी गर्दी न करण्याबाबतचं केलेलं आवाहन योग्यच आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येने लोक जमतील अशा ठिकाणी मी सहसा जाणार नाही. गेलो तरी हॉलमधील कार्यक्रमाला जाणार. तिथे खुर्च्यांमधील अंतर असेल तरच जाणार, असं पवार यांनी जाहीर केलं.