पुणे–महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मशिदीवरील भोंग्याविषयी वक्तव्य केले होते. त्यानंतर मनसेतील कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी यांच्यामध्ये नाराजी असल्याचे दिसून आले आहे. पुण्यातील मनसे नगरसेवक साईनाथ बाबर आणि वसंत मोरे हे नाराज असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पुण्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी माझ्या प्रभागात शांतता हवी असल्याने असं कोणतंही पाऊल उचलणार नसल्याचं म्हटलं आहे. तर नगरसेवक साईनाथ बाबर यांनी राज ठाकरेंनी आम्हाला उभं केलंय, नाराज असण्याचा प्रश्न नाही. अशी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईच्या कुर्ल्यात मनसे कार्यकर्ते मशिदींसमोर हनुमान चालिसा पठन करणार असल्याचं म्हटलं. काही ठिकाणचे भोंगे देखील उतरवण्याची तयारी सुरू आहे. अनेक ठिकाणी मनसैनिक आक्रमक झाले आहेत. मात्र, पुण्यात काही मनसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. पुण्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी माझ्या प्रभागात शांतता हवी असल्याने असं कोणतंही पाऊल उचलणार नसल्याचं म्हटलं आहे. राज ठाकरेंच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आल्याचं मोरे यांनी स्पष्टीकरण दिलं. मशिदीवरील भोंगे काढणार नाही. तर हनुमान चालीसा लावणार, असं राज ठाकरे म्हणाल्याचं त्यांनी सांगितलं. अनधिकृत गोष्टी असल्यास राज्य सरकारने त्यावर कारवाई करावी, असं ते म्हणाले.
आमचे काही कार्यकर्ते उत्साही असतात. राज साहेबांच्या आदेशानंतर त्यांनी हनुमान चालिसा लावली. मात्रस मी माझ्या प्रभागात असं काही करणार नाही, असं मोरेंनी स्पष्ट केलं. सध्या रमजान सुरु आहे. त्यामुळे मला माझ्या प्रभागात शांतता हवी आहे. म्हणून मी हनुमान चालीसा वगैरे काही लावणार नाही, असं पुणे शहर मनसे प्रमुख वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, राज ठाकरेंनी आम्हाला उभं केलं आहे, नाराज असण्याचा प्रश्न नाही अशी प्रतिक्रिया साईनाथ बाबर यांनी दिली आहे. साईनाथ बाबर हे नाराज असल्याची माहिती संपूर्ण शहरभर पसरली होती. त्यानंतर आज त्यांनी याबाबत खंडन केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे वक्तव्य केल्यानंतर साईनाथ बाबर आणि वसंत मोरे हे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. कारण या दोन्ही नेत्यांच्या प्रभागामध्ये मुस्लिम समाजाची संख्या जास्त आहे. याचा परिणाम निवडणूक निकालावर होऊ शकतो. त्यामुळे हे नगरसेवक नाराज असल्याची माहिती मिळत होती.