मराठवाडा मुक्ती संग्राम आणि रा. स्व. संघ


हैदराबाद संस्थानात हिंदुत्ववादी आणि राष्ट्रवादी विचारांच्या संघटनांना व बाहेरील नेत्यांना एक प्रकारे बंदीच घातली होती. त्यामुळे या प्रांतामध्ये संघाचे कार्य व्यायामशाळा किंवा मंडळांच्या नावाने चालत असत. १९३८ साली वंदे मातरम चळवळ सुरू झाली होती. यामध्ये औरंगाबाद येथे संघाचे दिवंगत स्वयंसेवक प्रल्हाद अभ्यंकर व त्यांचे सहकारी द. ग. देशपांडे व द. मा. देशमुख सोबत होते. नागपूरहून संभाजीनगरला वंदे मातरम सत्याग्रहासाठी हिंदू महासभेची मंडळी मोठ्या प्रमाणात आली, तेव्हा सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांनी अनेक कार्यकर्त्यांना त्यासाठी प्रोत्साहित केले होते, शिवाय आर्वीपर्यंत त्यांच्या बरोबर ते स्वतः आले होते, अशीआठवण या मोहिमेचे संघटक द. ग. देशपांडे सांगतात. त्याकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प. पू. गोळवलकर गुरुजी असताना त्यांनी हैदराबाद संस्थानातील हिंदूंची अवस्था व त्याविरुद्ध जनजागृती करणारे द. मा. देशमुख व द. ग. देशपांडे यांनी बौद्धिके शाखेवर घेण्यास सांगितले होते.  त्यामुळे वऱ्हाडात व निजाम संस्थानाच्या सीमावर्ती भागात वैचारिक क्रांती होण्यास मदत झाली. 
🔹 अकोल्याच्या महाशिबिरात श्रीगुरुजी यांनी द. ग. देशपांडे व द. मा. देशमुख यांचा परिचय स्वतः करून दिला होता. त्यात “वंदेमातरम सत्याग्रह व भागानगर निःशस्त्र प्रतिकार यातील त्यांचा सहभाग व वऱ्हाडात निजामविरुद्ध प्रचार करणारे आणि निजाम वऱ्हाड प्रांतावर जो हक्क सांगत आहे, त्यास विरोधकरणारे” असा परिचय करून दिला होता. पू. श्रीगुरुजी यांनी भागानगर सत्याग्रहात जास्तीत जास्त संख्येत स्वयंसेवकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही केले होते. भैय्यासाहेब दाणी हे त्यावेळी रा. स्व. संघाचे प्रमुख चालक व निष्ठावान स्वयंसेवकहोते. त्यांनी उमरखेड मार्गे जाऊन संस्थानात निःशस्त्र प्रतिकार केला होता. वाशीम येथे हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांची सोय ठेवण्यात रा. स्व. संघाचे स्वयंसेवक बाबासाहेब धनाग्रे वकील, कृष्णराव देशपांडे वकील, बाळासाहेब देशपांडे वकील, बाळासाहेब जतकर वकील, वयोवृद्ध अण्णासाहेब डबीर आणि रुकमानंद हरिश्चंद्र उपाख्य आबासाहेब देशपांडे, रिसोडकर वकील आदीसहभागीहोते. 
🔹 त्याचप्रमाणे लोणार, एलीचपूर, परतवाडा या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांना मदत केली व स्वतः निःशस्त्र प्रतिकार करण्यासाठी सहभागी झाले. यामध्ये दादासाहेब देशपांडे पार्डीकर, एलीचपूर कापड मिलचे मॅनेजिंग डायरेक्टर नानासाहेब देशमुख व लोकमान्य टिळकांचे समकालीन अनुयायी बळवंतराव बाबासाहेब देशमुख आदी स्वयंसेवक सहभागी होते. वाशीम, देऊळगाव, लोणार या ठिकाणी रा. स्व. संघाच्या सत्याग्रहींना थांबविले जाई व तेथून मग त्यांची तुकडी-तुकडीने पुढे रवानगी होई. असा उपक्रम सातत्याने चालू होता. या सत्याग्रहींना व प्रतिकारकांना तळणी – बामणी मार्गे जिंतूर व परभणीकडे पाठविले जाई. तर देऊळगावहून वाघरुळ-जालना मार्गे हैदराबाद किंवा औरंगाबाद मार्गे पाठविले जात असे. 
🔹 पू. डॉ. हेडगेवार व पू. श्रीगुरुजी यांच्या आदेशानुसार अशा शेकडो स्वयंसेवकांनी हैदराबाद येथील सत्याग्रहात भाग घेतला. निःशस्त्र प्रतिकार करून कित्येकांनी तुरुंगवासही भोगला. प्रचारकार्य व सत्याग्रहींना संस्थानात सोडून येण्याचे काही तुकड्यांचे कार्य अविरतपणे सुरू होते. वर्धा, चंद्रपूर व वऱ्हाडातील चार जिल्ह्यात हा प्रचार जोमाने सुरू होता.           

अधिक वाचा  वारसा जतन आणि संवर्धन आवश्यक -डॉ. शरद कुंटे

शब्दांकन – देविदास देशपांडे, पुणे 

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love