पुणे : ज्येष्ठ साहित्यिक विश्वास वसेकर यांची महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेच्या या वर्षीच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सव्वाशे वर्षापेक्षा जास्त काळ साहित्यक्षेत्रात अत्यंत मोलाचे काम करणाऱ्या या संस्थेच्या पुरस्कारांना प्रतिष्ठा असून साहित्यवर्तुळात या पुरस्काराकडे आदराने पाहिले जाते. वसेकर यांच्या ‘काव्यस्व’ या समीक्षा ग्रंथाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. वसेकर यांचा या वर्षातमधला चौथा पुरस्कार आहे. (Maharashtra Granthottejak sanstha award announced to Vishwas Wasekar)
वसेकर यांच्या पुस्तकांची यापूर्वी तीन पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. राज्यात मानाचा समजला जाणारा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार नुकताच त्यांना देण्यात आला. राज्यातील नऊ मान्यवरांना यावेळी गौरवण्यात आले. या पुरस्कारांपैकी विशेष साहित्य पुरस्कारासाठी वसेकर यांच्या ‘मूल्यत्रयीची कविता’ या पुस्तकाची निवड करण्यात आली होती. पुण्यातल्या संस्कृती प्रकाशनाच्यावतीने या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलंय. त्यापूर्वी त्यांची मराठवाडा साहित्य परिषदेच्या’वतीने दिल्या जाणाऱ्या म. भि. चिटणीस पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. ‘काव्यस्व’ या समीक्षा ग्रंथासाठीच त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. मराठी साहित्यातील समीक्षा ग्रंथासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
या तीन पुरस्कारांपूर्वी वसेकर यांच्या ‘जगण्याचा उत्सव’ या ललितलेखांच्या संग्रहाची इचलकरंजी येथील आपटे वाचन मंदिराच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. वसेकर यांच्या नावावर आतापर्यंत ललितगद्य या साहित्यप्रकारातली दहा पुस्तकं आहेत. वसेकर यांनी विविध साहित्यप्रकार हाताळले असून कविता, समीक्षाग्रंथ, व्यक्तिचित्रणात्मक स्वरुपाच्या लेखन प्रकारातही त्यांची अनेक पुस्तके यापूर्वी प्रकाशित झाली आहेत. विविध दैनिके आणि साप्ताहिकांमध्ये त्यांचे स्तंभलेखन सुरू आहे.