संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे उर्जास्त्रोत-लोकशाहीर अण्णा भाऊ साठे

महाराष्ट्र लेख
Spread the love

♦️साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी साहित्यापासून नेहमीच वंचित असलेल्या समाजाचे वास्तव जीवन आपल्या प्रखर लेखणीच्या माध्यमातून चित्रित करुन आपला समाज, आपली माणसं, त्यांचं जगणं साहित्याचा विषय बनवण्यासाठी आपली लेखणी अहोरात्र झिजवली.साहित्य हे समाजजीवनाचे प्रमुख अंग असून त्यामध्ये समाजजीवनाचे प्रतिबिंब असले पाहिजे, वास्तव परिस्थितीचे जिवंत दर्शन घडवले पाहिजे, या जाणिवेतून त्यांनी साहित्याचा मळा फुलवला.

♦️ “मी जे जीवन जगतो, पाहतो, अनुभवतो, तेच मी लिहितो. मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारता येत नाही. त्याबाबतीत मी स्वतःला बेडूक समजतो” अशी प्रांजळ आणि प्रामाणिक कबुली देणारे अण्णा भाऊ म्हणूनच मनापासून भावतात. त्यांची जीवनावर अपार श्रद्धा होती. केवळ मनोरंजनासाठी साहित्यनिर्मिती असू नये, असा महत्वाचा विचार त्यांनी तमाम साहित्य जगताला दिला.ते आपल्या लेखणीतून सातत्याने दलित, वंचित, पीडित,उपेक्षित, बहिष्कृत आणि अन्यायग्रस्त माणसांची व्यथा-वेदना मांडत राहिले.

♦️समतायुक्त समाजाच्या निर्मितीसाठी, स्वातंत्र्य, समता, न्याय, आत्मसन्मान आणि आर्थिक समतोल निर्माण करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारे, बंडखोरी करणारे, धाडसी, करारी, शूरवीर आणि स्वाभिमानी नायक त्यांनी रेखाटले. फकिरा, सत्तू भोसला, हिंदूराव, मास्तर या सर्व बंडखोर आणि क्रांतिकारी माणसांना आपल्या साहित्यातून अजरामर केले. साहित्यातून समाज प्रबोधन आणि त्यातून समाज परिवर्तन हेच त्यांच्या साहित्याचे सूत्र असल्याचे दिसते.

♦️१९५२ साली झालेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलताना ते आपल्या साहित्याच्या जाणिवा स्पष्ट करतात, “ दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटन माझ्यासारख्या एका दलितानं करावं हा अपूर्व असा योग असला तरी हे आचार्य अत्रे यांचे मी कार्य करीत आहे, याची मला जाणीव आहे. दलित साहित्यिकांचे वेगळे संमलेन भरवून हा वेगळा सवतासुभा का उभा करता? असा प्रश्न काही मंडळी करत आहेत.काहींच्या मते, अस्पृश्यता निवारण करणारा कायदा अस्तित्वात असल्यामुळे आज दलित हा शब्दच निरर्थक झाला आहे. सर्व काही ठीक आहे. परंतू हा प्रश्न निर्माण करणारे दलितांना माणूस म्हणून मानतात. परंतू त्या दलितांचा एक वर्ग आहे, ही गोष्ट ते मान्य करत नाहीत. त्यामुळेच वरील प्रश्न निर्माण झाला आहे, होत आहे.

♦️केवळ महाराष्ट्रापुरतेच बोलायचे झाले तरी दलितांचा मोठा वर्ग या देशात अग्रेसर असून, त्याच्या न्याय्य संघर्षाचे परिणाम सर्व समाजावर होत असतात.तो या देशाचा सामाजिक, सांस्कृतिक पाया आहे. परंतू तो पिळला जाणारा आणि कष्ट करणारा दलित म्हणून वेगळा आहे, उपेक्षितही आहे.

♦️अशा या दलिताला आपल्या जीवनाचे स्पष्ट प्रतिबिंब आजच्या मराठी साहित्यात दिसत नाही. साहित्य हे आरशासारखे स्वच्छ असावे. त्यात आपलं प्रतिबिंब स्पष्ट दिसावं एवढीच त्याची मागणी आहे. आपला चेहरा आहे तसा दिसावा असं वाटणं गैर नाही. कारण तरंगमय तळ्यात पडलेली सावली जशी लांबुळकी आणि डगमगती दिसते तद्वत आजचा दलित आजच्या साहित्यात दिसतो. असे वर्णन आपल्या मनोज्ञ भूमिकेतून अण्णा भाऊ करतात.

♦️हजारो वर्षे गुलामगिरीच्या चिखलात रुतून बसलेल्या दलित, पददलित, वंचित, पीडित समाजाला बाहेर काढण्यासाठी व पोलादी साखळदंडांनी बंदिस्त जीवन जगत असलेल्या आणि मनस्वी वेदनेने व्याकुळ झालेल्या शोषित समाजाला शोषणमुक्त आणि समतायुक्त जीवनानुभव देण्यासाठी अण्णा भाऊंनी आपले संपूर्ण आयुष्य समाज परिवर्तनासाठी झिजवले.

♦️देशभर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आंदोलनांचे जोरदार पडघम घुमत असताना अण्णा भाऊंच्या लेखनाला सुरुवात झाली. भारतीय स्वातंत्र्याचा लढा राष्ट्रीय नेते पुढे पुढे रेटत नेत होते. अण्णा भाऊ आपल्यातील सृजनशक्ती जागवत त्या गाड्याला अधिक प्रगत,गतिमान करण्यासाठी हिरीरीने वापरत होते.

♦️आपल्या भारत देशाला १५ ऑगस्ट,१९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. राज्यकारभाराच्या सोयीसाठी भाषावार प्रांतरचना करण्याचे तत्कालीन राजकीय नेतृत्वाने ठरवले. १ मे,१९६० रोजी महाराष्ट्र हे राज्य म्हणून अस्तित्वात आले. मुंबई हे बेट गुजरात राज्यात ठेवावे की महाराष्ट्रात? याबाबत अनेक वाद झाले. बेळगांव, कारवार, निपाणी, डांग, उंबरगाव हे मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रापासून अलग करुन ते सर्व शेजारच्या कर्नाटक राज्यात समाविष्ट करण्यात आले. महाराष्ट्राने तत्कालीन केंद्र शासनाविरुद्ध अतिशय तीव्र आंदोलन केल्यामुळे राज्यांच्या पुनर्रचनेच्या वेळी मुंबई महाराष्ट्राला मिळाली. हेच आंदोलन ‘संयुक्त महाराष्ट्र आंदोलन’ या नावाने ओळखले जाते. या आंदोलनात अण्णा भाऊंची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली.

♦️संयुक्त महाराष्ट्र चळवळ, बेळगांव-कारवार सीमावाद आंदोलनामध्ये हिरीरीने भाग घेणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या स्थापनेपूर्वी आणि स्थापनेनंतर अण्णा भाऊंनी सर्वसामान्य जनांना आपल्याभोवतीच्या राजकीय घडामोडींबद्दल जागृत आणि सजग करण्याचे मोठे कार्य केले. अण्णा भाऊंनी आपली लेखणी खऱ्या अर्थाने सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी झिजवली. मराठी संस्कृती आणि आपला महाराष्ट्र यांच्यावरील गीते, पोवाड्यांची रचना त्यांनी केली. या सर्व रचनांमधून उत्स्फूर्तता, जोश,जाज्वल्य देशाभिमान इ.बाबत भरभरून लिहिले. मराठी भाषा, संस्कृती, महाराष्ट्र मायभूमी यांबद्दल ओढ, अपार प्रेम आणि श्रद्धा त्यांच्या प्रत्येक शब्दाशब्दांतून व्यक्त होत होती.

♦️या रचनांमध्ये शाहिरांनो!, महराष्ट्र देश आमुचा, उठला महाराष्ट्र देश, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळूनी काया, माझी मैना गावावर राहिली, जग बदलूनी घाव या गीत शाहिरीने संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमून गेला. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.ना. गव्हाणकर यांच्या अलौकिक जोशपूर्ण आणि वीरश्रीयुक्त गायनाने. समाज जागृती आणि प्रबोधनाचे फार मोठे प्रभावी कार्य या शाहीरत्रयींनी महाराष्ट्रभर केले.

♦️महाराष्ट्राची भूमी ही शूर वीरांची, श्रम करणाऱ्यांची, शेतकरी- कष्टकर्‍यांची आणि संत-पंत आणि तंतांची आहे. पराक्रमी असलेल्या मराठी भाषकांचा महाराष्ट्र खंडित झाला आहे. त्यातल्या मराठी भाषकांच्या भूभागावर अन्य भाषकांची मालकी आहे. तेव्हा खंडित झालेला महाराष्ट्र पुन्हा अखंड मराठी भाषकांचा म्हणून उभा करण्यासाठी शौर्याची, स्वाभिमानाची आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची परंपरा असलेल्या मराठी जणांना रणमैदानात उडी घेण्याचे आवाहन करत, त्यांना कृतीप्रवण करण्याचे काम अतिशय धडाडीने अण्णा भाऊ करतात. अण्णा भाऊंनी ‘महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळूनी काया’ ही रचना संयुक्त महाराष्ट्र आंदोलनच्या पार्श्वभूमीवर लिहिली. आपल्या समृद्ध परंपरेपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील जनतेने संयुक्त महाराष्ट्रासाठी संपूर्ण ताकदीनिशी लढावे. मृत्यूला तोंड द्यायची वेळ आली तरी आपले पाय मागे घेवू नये असे आवेशपूर्ण आवाहन अण्णा भाऊ आपल्या जीवाभावाच्या बंधू-भगिनींना ते आपल्या कवनातून करतात.

♦️कंबर बांधून ऊठ घाव झेलाया

महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळूनी काया |

महाराष्ट्र मंदिरापुढती | पाजळे यशाची ज्योती |

सुवर्ण धरा खालती | नील अंबर भरले वरती |

गड पुढे पोवाडे गाती | भूषवी तिला महारथी |

तो अरबी सागर लागे जयाचे पाया

महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळूनी काया ||

ही मायभूमी धीरांची | शासनकर्त्या वीरांची

घामाची आणि श्रमाची | खुराप्याची आणि दोरीची

संतांची, शाहिरांची | त्यागाच्या तलवारीची

स्मरून धुरंधर आता त्या शिवराया

महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळूनी काया ||

पहा पर्व ते पातले आजचे | संयुक्त महाराष्ट्राचे

साकार स्वप्न करण्याचे | करी कंकण बांधून साचे

पर्वत उलथून यत्नाचे | सांधू या खंड की त्याचे

या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकाया

महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळूनी काया

धर ध्वजा करी ऐक्याची | मनिषा जी महाराष्ट्राची

पाऊले टाक हिमतीची | कणखर जणू पोलादाची

घे आन स्वातंत्र्याची | महाराष्ट्रास्तव लढण्याची

उपकार फेडुनी जन्मभूमीचे जाया

महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळूनी काया ||

♦️मराठी प्रांत आणि त्यातल्या माणसाच्या शौर्याची गौरवगाथा कथन करणारे ‘उठला मराठी देश’ या गौरव गीतालाही संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळावी या मागणीसाठी मुंबईच्या रस्त्यावर आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांची स्तुती या गीतामधून अण्णा भाऊ करतात.

पराजयाचे पीक ना येथे गुण हा ज्या मातीचा |

देशासाठी लढणे, मरणे बाणा ज्या जातीचा |

धगधगत्या कुंडांत झोकुनी निज प्राणाहुती |

महाराष्ट्रास्तव मरून जाहले अजरामर किर्ती |

भव्य बांधुनी बलिदानाचे मंदिर या भूवर ||

♦️शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मराठी मुलुखाला , महाराष्ट्राच्या रक्षणासाठी बळ कसे मिळते, त्यांच्यात उत्साह कशा प्रकारे संचारतो, त्यांचं शौर्य कसं पणाला लागते याचं यथार्थ वर्णन अण्णा भाऊ करतात,

उठला मराठी देश परतुनी झाला घनगंभीर | महाराष्ट्र राखण्या घालुनी घोड्यावर खोगीर ||

♦️कोणत्याही कलावंताने आपली सामाजिक बांधिलकी स्वीकारून कार्यरत राहिले पाहिजे, या विचारांचे कृतिशील महापुरुष म्हणजे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे होते . समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, यांच्या न्याय्य हक्कासाठी हातात डफ घेऊन अण्णा भाऊंमधल्या लढवय्या कार्यकर्ता रस्त्यावर उतरला, स्वतःची उत्तुंग प्रतिभा समाजाच्या कल्याणासाठी प्रकाशमान केली.

♦️पुणे विद्यापीठाचे (आताचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) १० वे कुलगुरू डॉ.देवदत्त दाभोळकर यांनी साहित्य आणि साहित्यिक यांची अतिशय सुलभ आणि सुटसुटीत व्याख्या केली आहे, ते म्हणतात, “सरस ते साहित्य आणि समरस तो साहित्यिक”. खरोखरच अण्णा भाऊंना ते तंतोतंत लागू पडते, या मातीतील, ज्वलंत आणि जिवंत, रसरशीत साहित्य अण्णांनी महाराष्ट्रावर जीवापाड प्रेम करत भरुभरून दिले, इथल्या समाजजीवनाशी समरस झालेल्या ‘अण्णा भाऊंची लेखणी जगात देखणी’ असेच म्हणावे लागेल.

♦️डॉ.सुनील दादोजी भंडगे ♦️   

♦️लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *