बिबट्याचा मृत्यू: अज्ञात वाहनाने दिली धडक
पुणे—पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेने एका बिबट्याचा मृत्यू झाला. बिबट्याचा वावर आता लोक वस्तीतून महामार्गाच्या दिशेने होत असल्याने बिबट्याच्या अपघातात वाढ होत आहे. भक्ष्याच्या शोधात हा बिबट्या आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे.
मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एक बिबट्या जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या बीट मार्शल यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांना कात्रज बोगद्यातून पुण्याकडे येणाऱ्या रस्त्यावर एक बिबट्या जखमी अवस्थेत पडल्याचे आढळले. तोपर्यंत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार वन विभागाच्या अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान या बिबट्याचा डोक्याला अज्ञात वाहनाची जोराची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाला.
मागील काही दिवसांपासून रस्त्यावर होणारे अपघात बिबट्यांचा मृत्यू होण्याची मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मानव वन्य प्राणी यांच्यात वाढत चाललेल्या संघर्षावर वनविभागाने उपाय योजना करणे गरजेचे आहे.