पुणे—अल्पसंख्यांकांचे कितीही तुष्टीकरण करा, लांगूलचालन करा, कोणताच कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही. महाराष्ट्रात फक्त मोदी पॅटर्न, बीजेपी पॅटर्न, छत्रपती शिवरायांचा पॅटर्न चालेल असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
भाजपच्या प्रदेश कार्यकसमितीची बैठक गुरूवारी पुण्याच्या बालंगधर्व रंगमंदिरात पार पाडली. या बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांच्या भाषणात विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
फडणवीस म्हणाले, “सगळे म्हणताहेत की देशात आणि महाराष्ट्रात कर्नाटक फॉर्म्युला लागू करणार. त्यांचा कर्नाटक फॉर्म्युला लोकसभेतच लक्षात येईल. लोकसभेत भाजप २८ पैकी किमान २५ जागा जिंकेल. पण तरीही, जे लोक म्हणतात कर्नाटक फॉर्म्युला लागू करणार त्यांना एवढंच सांगतो, हा छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे, धर्मवीर संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही असा विचार कराल की अल्पसंख्यांकांचं ध्रुवीकरण करून तुम्हाला निवडून येता येईल, पण हे शक्य नाही. कारण या ठिकाणी शिवरायांनी एकेक मावळा तयार केला आहे. त्याला देव, देश, धर्माकरता कसं लढायचं हे माहितेय, त्यामुळे निश्चितपणे भाजपाचा मावळा दाखवून देईल. तुम्ही अल्पसंख्यांकांचे कितीही तुष्टीकरण करा, लांगूलचालन करा. लांगूलचालन करून कोणताच कर्नाटक पॅटर्न चालणार नाही. येथे एकच पॅटर्न चालेल मोदी पॅटर्न, बीजेपी पॅटर्न, छत्रपती शिवरायांचा पॅटर्न चालेल. दुसरा पॅटर्न येथे चालू शकणार नाही.
महाविकास आघाडीबाबत बोलताना ते म्हणाले, “आता हे तिघे एकत्रित येताहेत म्हणतात. आज भाजपा आणि शिवसेनेची युती अतिशय भक्कम आहे. ज्या शिवसेनेने विचारांकरता सरकार सोडलं ते आपल्यासोबत आहेत. ज्यांनी सरकारकरता विचार सोडले ती शिल्लकसेना महाविकास आघाडीकडे आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की येत्या निवडणुकीत भाजपा कोणत्याही परिस्थितीत पालिका, जिल्हापरिषद, लोकसभा, विधानसभेत निवडून येईल. आपल्या निवडून येण्याचा फॉर्म्युला मोदींची कार्यशैली, सामान्यांचा विकासाचा नरेटिव्ह आहे, असंही ते म्हणाले.
भाजपने कर्नाटकात ७०० पेक्षा कमी मतांच्या अंतराने सात जागा गमावल्या. तर ४२ जागा या ४ ते ५ हजार मतांच्या अंतराने गमावल्या. यामुळे बुथ सशक्तीकरण आवश्यक झाले असून पुढील लढाई ही बुथची असेल. कर्नाटकात पराभव झाला तरी उत्तर प्रदेशच्या स्थानिक निवडणूकांत भाजपने स्वत:चा विक्रम मोडत मोठे यश मिळवले. परंतू, त्याची जास्त चर्चा झाली नाही, असे ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने भाजप-शिवसेनेच्या सरकारवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे सरकारला बेकायदेशीर म्हणणाऱ्यांचे तोंड बंद झाले असेल. परंतू, काही जण अजूनही न्यायालयाचा निर्णय मानायला तयार नाहीत. उद्धवजींना कोणी तरी सांगा तुमचा पोपट मेलाय. उद्धव ठाकरे सांगताय की प्रत्येक गावागावात जाऊन सांगा निर्णय आपल्या बाजूने लागलाय. बडवा जाऊन, काही हरकत नाही,आपल्या बापाचं काय जातंय अशी खिल्ली त्यांनी उडवली. या शिल्लक सेनेची आठ पैकी एकही मागणी न्यायालयात मान्य झाली नाही. भाजप-शिवसेनेचे सरकार पुर्णपणे कायदेशीर असून ते आपला कार्यकाळ पुर्ण करेल. तसेच आगामी निवडणूकीनंतर पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.