पुणे(प्रतिनिधी)- आषाढी वारीसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी दुपारच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पालखी सोहळय़ासाठी राज्याच्या कानाकोपऱयातून देहूत लाखो वारकरी दाखल झाले असून, इंद्रायणीकाठ भक्तीने फुलून गेला आहे.
ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्यांच्या संगतीने पंढरीच्या वाटेवर चालण्यासाठी वारकऱयांच्या दिंडय़ा देहूनगरीत विसावल्या आहेत. देहूच्या दिशेने येणाऱया रस्त्यांवर खांद्यावर भागवत धर्माची पताका घेतलेले वारकरी आणि डोईवर वृंदावन घेऊन निघालेल्या महिला दिसून येत आहेत. टाळ-मृदंगाच्या गजरामध्ये प्रत्येकाच्या मुखातून हरिभक्तीचे सूर निघत आहेत. देवस्थानकडून पालखी सोहळय़ाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोहळय़ात सहभागी होणाऱया वारकरी आणि भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनाकडूनही सज्जता ठेवण्यात आली आहे. पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून, देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांची तयारी केली जात आहे.
तुकोबांच्या पालखीचे दुपारी प्रस्थान
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा यंदा 339 वा पालखी सोहळा असून प्रस्थान सोहळय़ाची सुरुवात 28 जूनला पहाटेपासूनच होणार आहे. पहाटे साडेचार वाजल्यापासून देऊळवाडा, शिळा मंदिर, विठ्ठल-रखुमाई मंदिर, तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्तांच्या वतीने महापूजा होईल. सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन आणि इनामदार वाडय़ात तुकोबांच्या पादुकांचे पूजन होईल. दुपारी अडीचच्या सुमारास इनामदार वाडय़ातून महाराजांच्या पादुका देऊळवाडय़ातील भजनी मंडपात येतील. त्यानंतर प्रस्थान सोहळय़ाच्या कार्यक्रमास प्रारंभ होईल. सायंकाळी पाच वाजता पालखी प्रदक्षिणा, साडेपाच वाजता पालखी इनामदारवाडय़ाकडे मार्गस्थ होईल आणि रात्री इनामदार वाडय़ात पालखी सोहळय़ाचा मुक्काम असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी दिली. या सोहळय़ासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निमंत्रण दिल्याचे त्यांनी सांगितले. इनामदारवाडय़ातील मुक्कामानंतर शनिवारी तुकोबांच्या पालखीचा आकुर्डीत मुक्काम असेल.
गुरुवारी, शुक्रवारी जड वाहतूक बंद
दोन दिवस देहूतील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. तसेच शनिवारी पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी ते देहूरोडदरम्यानची वाहतूक कात्रज बाह्यवळण महामार्गाने वळविण्यात आलेली आहे.
पालखी प्रस्थान सोहळा कार्यक्रम
– पहाटे ४.३० वाजता : देऊळवाडय़ात काकडा
– पहाटे ५ वाजता : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व शिळा मंदिरात महापूजा
– पहाटे ५.३० : तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्तांच्यावतीने महापूजा
– सकाळी १० ते १२ : देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन
– सकाळी ९ ते ११ : इनामदारवाडय़ात संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन
– दुपारी २.३० : इनामदार वाडय़ातून संत तुकाराम महाराजांच्या पादुका देऊळवाडय़ातील भजनी मंडपात येणार
– दुपारी २.३० नंतर : पालखी प्रस्थान सोहळय़ाच्या कार्यक्रमास प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ
– सायंकाळी ५ वाजता: पालखी प्रदक्षिणा
– सायंकाळी ५.३० वाजता : पालखी इनामदार वाडय़ाकडे मार्गस्थ
– रात्री इनामदार वाडय़ात पालखी सोहळय़ाचा मुक्काम
पुण्यात पालखी सोहळ्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार
दरम्यान, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि श्री जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी (३० जून) शहरात दाखल होणार आहे. पालखी सोहळ्यासाठी वारकरी, तसेच भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने गर्दीच्या नियोजनासाठी शहरात पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी मनोरे उभे करण्यात येणार आहेत.
श्री क्षेत्र देहू येथून जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी (२८ जून) प्रस्थान होणार आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शनिवारी (२९ जून) प्रस्थान ठेवणार आहे. रविवारी (३० जून) पालखी सोहळा शहरात दाखल होणार आहे. सोमवारी पालख्यांचा मुक्काम नाना- भवानी पेठेत असणार आहे. मंगळवारी (२५ जून) पालखी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिरात असणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात असणार आहे. पालखी आगमन, मुक्काम, प्रस्थान सोहळा विचारात घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.