पुणे- माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे दसर्याच्या शुभमुहूर्तावर उत्तराखंड येथील माणा गावात श्री सरस्वती ज्ञान-विज्ञान धाम/मंदिर, ऐतिहासिक स्वर्गारोहण मार्गावर ‘पांच पांडवांच्या भव्य मूर्ती, स्वर्गारोहण महाद्वार व विश्वशांती घंटेची स्थापना करण्यात आली. अशी माहिती ज्येष्ठ शिक्षणतज्ञ विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी एमआयटीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
एमआयटीच्या वतीने भारताच्या प्रथम गावाच्या प्रवेशाजवळ ‘श्री महावीर घंटाकर्ण’ यांच्या नावाने अतिशय देखणे व भव्य असे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे.
या प्रसंगी बद्रिनाथ धाम मंदिर प्रशासनाला विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी अडीच लाख रूपयांचा धनादेश त्यागमूर्तीं श्रीमती प्रयागअक्का कराड यांच्या स्मरणार्थं अन्नदानासाठी चमोलीच्या एसडीएम सौ. कुमकुम जोशी यांच्याकडे सुपूर्तं करण्यात आला. त्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड व उषा विश्वनाथ कराड यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी सन्माननीय प्रमुख पाहुणे होते. तसेच माजी खासदार व अयोध्या येथील रामजन्मभूमी शिलान्यासचे माजी कार्यकारी अध्यक्ष, रामायणाचे ख्यातनाम प्रवचनकार डॉ. रामविलास वेदांती, अध्यात्मिक गुरू व साधक योगी अमरनाथ, उत्तराखंड भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष महेंद्र भट्ट, आमदार सुरेश गडिया व नंदनसिंग कोश्यारी, चमोली जिल्ह्याच्या विशेष न्यायदंडाधिकारी सौ. कुमकुम जोशी, माणा गावचे मुख्य प्रधान श्री. पितांबरसिंह मोल्पा उपस्थित होते.
भगतसिंह कोश्यारी म्हणाले की,“सरस्वती नदीच्या उगमस्थानावर डॉ. विश्वनाथ कराड यांनी मंदिर निर्मिती करून केवळ हिमालयात नाही तर संपूर्ण जगात त्याची शोभा वाढविली आहे.”
डॉ. रामविलास वेदांती म्हणाले,“श्री सरस्वती मंदिर, स्वर्गारोहण मार्गावरील स्वर्गप्रस्थानाचे स्मारक, स्वर्गारोहणाचे प्रवेशद्वार व त्यावरील विश्वशांती घंटेची स्थापना करणे या सर्व अद्भूत व ऐतिहासिक घटना आहे. देशातील धार्मिक तीर्थक्षेत्रांचे ज्ञानतीर्थक्षेत्रांमध्ये परिवर्तन होत आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“२००९ मध्ये केलेल्या संकल्पामुळे ज्ञान भूमीतून देवभूमी येथे पोहचलो. मी येथे सेवकाच्या भूमिकेत आलो आहे. ईश्वरीय संकेतामुळेच संपूर्ण जगातील भक्त बद्रीनाथ, केदारनाथ नंतर सरस्वती मंदिरात येत आहेत. पूर्व मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी व ग्रामनिवासीयांच्या सहयोगाने मंदिराची निर्मिती झाली आहे. ज्ञानाची देवी माता सरस्वती आणि ज्ञानाचे प्रतिरूप मानले गेलेले तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांची एकत्र प्रतिष्ठापना माणा गांव येथे श्री सरस्वती नदीच्या उद्गमस्थली व्हावी. त्याचबरोबर समचरण पांडुरंग, माता रुख्मिणी, गुरुदेव दत्त, श्री गणेश, वायुपुत्र हनुमान, महर्षी वेदव्यास, जगद्गुरू म्हणून ओळखले गेलेले तत्त्वज्ञ संत श्री तुकाराम महाराज आणि भारतरत्न विश्वगानसम्राज्ञी लता मंगेशकर या सर्वांच्याच मूर्ती एकत्रितपणे प्रतिष्ठापित व्हाव्यात. तसेच राष्ट्रीय कीर्तनकार शतायुषी श्री शेलारमामा यांच्या प्रतिमेसह ध्यानयोग केंद्राची उभारणी हे स्वामी विवेकानंद यांनी भाकित केल्याप्रमाणे, भारत ‘विश्वगुरू’ होण्याकडे वाटचाल करीत असल्याचे संकेत आहेत.”
या कार्यक्रमाच्या प्रसंगी ह.भ.प. तुळशीराम दा. कराड, उषा विश्वनाथ कराड, संजीवनी कराड, राजेश कराड, माणा गावाचे मुख्य प्रधान पितांबर सिंग मोल्पा, माईर्स एमआयटीच्या वतीने डॉ. मिलींद पात्रे, डॉ. महेश थोरवे आणि माणा गावचे समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण माणा गावचे मुख्य प्रधान श्री. पितांबर सिंग मोल्पा यांनी केले.
आयोजित पत्रकार परिषदेत एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे सल्लागार डॉ. संजय उपाध्ये, डॉ. मिलिंद पात्रे व डॉ. महेश थोरवे उपस्थित होते.