‘पुण्यकथा’ मधून उलगडणार दक्षलक्ष वर्षांपासूनची पुण्याची गोष्ट

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे -आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्यासोबतच तो गोष्टीरुपात तरुण व नव्या पिढीपर्यंत पोहोचावा या उद्देशाने पुण्यातील मंजिरी खांडेकर यांच्या संकल्पनेमधून ‘पुण्यकथा’ या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. हेरिटेज इंडिया या संस्थेच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून या संबंधीची माहिती खांडेकर यांनी आज भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

‘पुण्यकथा’ या पुस्तकाचे मार्गदर्शक, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती व पुरातत्व संशोधक डॉ. गो. बं. देगलूरकर, हेररिटेज इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मंजिरी खांडेकर, पुण्यकथा या पुस्तकाच्या लेखिका कल्याणी सरदेसाई, पुस्तकातील विषयाच्या संदर्भात संशोधनासाठी विशेष मदत केलेले प्रो. प्र के घाणेकर, डॉ. अजित वामन आपटे, पुस्तकाचे क्रिएटिव्ह डिरेक्टर तेजस मोडक, पुस्तकातील आर्टवर्क ज्यांची आहेत त्यांपैकी अनंत देरे, आर्ट पुणे फाउंडेशनचे अध्यक्ष संजीव पवार आदी मान्यवर या वेळी उपस्थिती होते.

या वेळी बोलताना डॉ. देगलूरकर म्हणाले, “आज किती जणांना इतिहास हा विषय आवडतो हा खरा प्रश्न आहे. मात्र इतिहासाची माहिती असल्याशिवाय इतिहास निर्माण करता येत नाही हे ही तितकेच खरे. आपल्या पुण्याच्या दक्षलक्ष वर्षांपासूनच्या गौरवशाली इतिहासाची माहिती जास्तीत जास्त वाचकांना व्हावी, या उद्देशाने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. वाचनीय, देखण्या आणि प्रबोधनपर गोष्टींच्या माध्यमातून आम्ही हा इतिहास मांडला आहे. शासकीय यंत्रणेतून आलेल्या माहितीखेरीज अधिकची माहिती रंजक पद्धतीने देण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. प्रागैतिहासिक काळापासून ते अर्वाचीन काळापर्यंतची सफर हे पुस्तक घडविते. पुण्याशी संबंधित इतिहासातील सर्व भागांचे कांगोरे या पुस्तकात आले असल्याचा आम्हाला आनंद आहे.”           

मंजिरी खांडेकर म्हणाल्या, “कोणतेही शहर हे केवळ मानवी वस्तीचे स्थान नाही तर त्या ठिकाणी विस्तारणा-या संस्कृतीच्या प्रगतीचे भावविश्व असते. आपल्या याच भावविश्वाची माहिती तरुण व नव्या पिढीला व्हावी या उद्देशाने हेररिटेज इंडियाच्या माध्यमातून आम्ही ‘पुण्यकथा’ या पुस्तकाची निर्मिती केली आहे. आजच्या अस्थिरतेच्या काळात नागरिकांना आपल्या संस्कृतीची, इतिहासाची माहिती व्हावी, त्याबद्दल अभिमानाची भावना निर्माण व्हावी आणि आपल्या शहराचा ऐतिहासिक, संपन्न व समृद्ध इतिहास त्यांच्या समोर यावा, हा हे पुस्तक बनविण्यामागील हेतू आहे.” 

‘पुण्यकथा – पुणेज स्टोरी ऑफ अ मिलियन इयर्स’ या पुस्तकात पुणे जिल्ह्याचा रोमांचित करणारा सचित्र इतिहास पहायला मिळणार आहे. लहान मुलांसाठी गोष्टीरुपात दशलक्ष वर्षांपासून जिल्ह्याशी संबंधित विविध कथा यामध्ये मांडण्यात आल्या असून विद्येचे माहेरघर आणि भारतातील राहण्यासाठीचे सर्वोत्तम शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्याचे ऐतिहासिक कांगोरे यामध्ये आपल्या समोर येतील. लहान मुलांसाठी सुंदर चित्रांसोबतचा गोष्टीरूपी इतिहास आणि मोठ्यांसाठी पुण्याशी संबंधित विश्वकोश म्हणून याचा दुहेरी उपयोग वाचकांना करता येणार असल्याची माहितीही मंजिरी खांडेकर यांनी दिली. 

नऊ विभागात असलेल्या या पुस्तकात एकूण २४८ पाने असून विविध प्रकारचे नकाशे, कविता, लहान मुलांना आवडतील अशा गमतीजमतींचा समावेश यामध्ये आवर्जून करण्यात आला आहे. इतिहासाचे पुस्तक नव्हे तर पुण्याची रोमांचकारी कथा सांगणारे पुस्तक या दृष्टीनेच आम्ही या पुस्तकाचे लिखाण केले असल्याची माहिती पुस्तकाच्या लेखिका कल्याणी सरदेसाई यांनी दिली. कंटाळवाण्या पद्धतीने इतिहासाच्या सनावळ्या सांगण्यापेक्षा मुलांना वाचायला आवडेल अशा पद्धतीने आम्ही या पुस्तकाची रचना केली असल्याचेही त्यांनी नमूद केले. या पुस्तकात लहान मुलांच्या पात्रांचे संवाद, रंगीबेरंगी चित्रे अशा गोष्टींचा समावेश असल्याने लहानांसोबतच मोठ्या व्यक्तींना देखील हे वाचण्यामध्ये आनंद मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वाचकांनी या आधी क्वचितच पाहिलेली छायाचित्रे, नकाशे, कोडी आणि पत्रकांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला असून पुणे जिल्ह्यात अस्तित्वात असलेला आदिम मानव, पाषाण युगातील छोट्या बस्त्या, सातवाहन, यादव काळ, भक्ती चळवळ, ब्रिटीश काळ, स्वातंत्र्य चळवळ याबरोबरच आजचे पुणे, शहरातील महत्त्वाची ठिकाणे, त्यांचे महत्त्व, संदर्भ, झाडे, पक्षी, पर्यावरण, देशाच्या इतिहासातील पुण्याशी संबंधित राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी यांवर या पुस्तकामध्ये प्रकाश टाकण्यात आला असून पुण्याचे ऐतिहासिक प्रतिनिधित्व करणारे पुस्तक म्हणून आपण याचे वर्णन करू शकतो असेही खांडेकर यांनी या वेळी आवर्जून सांगितले. परदेशात स्थिरावलेल्या भारतीयांच्या पुढील पिढीसाठी आपल्या मातृभूमीची ओळख करून देणारा एक ग्रंथरुपी ठेवा असेही याचे वर्णन करता येईल. सदर पुस्तक हे इम्ग्राजे भाषेत असून नजीकच्या भविष्यात मराठी भाषेतही ते प्रकाशित करण्याचा मानस खांडेकर यांनी बोलून दाखविला.

सदर पुस्तकाची मूळ संकल्पना ही हेरिटेज इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मंजिरी खांडेकर यांची असून कल्याणी सरदेसाई यांनी याचे लेखन केले आहे. पुरातत्व संशोधक डॉ. गो. बं. देगलूरकर यांबरोबरच लेखक प्रो. प्र के घाणेकर, डॉ अजित वामन आपटे आणि डॉ. मंजिरी भालेराव यांचे विशेष सहकार्य पुस्तकाशी संबंधित संशोधनासाठी लाभले असून तेजस मोडक यांनी पुस्तकाची क्रिएटिव्ह बाजू खंबीरपणे सांभाळली आहे. राहुल देशपांडे, देवदत्त फुले, अनंत देरे, भास्कर सागर व तेजस मोडक यांच्या आर्टवर्कचा समावेश पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. पुस्तकाचे ले आऊट व डिझाईन सुनील गोकर्ण यांचे असून पुस्तकाशी संबंधित कार्यक्रमासाठी नम्रता खांडेकर बुआलो यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

हेरिटेज इंडिया विषयी – मागील १४ वर्षांपासून हेरिटेज इंडिया संस्थेच्या वतीने ‘हेरिटेज इंडिया’ व ‘महाराष्ट्र अनलिमिटेड’ या नावाने त्रैमासिके प्रकाशित करण्यात आली आहेत. याशिवाय संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी हेरिटेज वॉक व विशेष सहलींचे आयोजन देखील करण्यात येते. या बरोबरच पर्यटकांना ऐतिहासिक वारसा माहित व्हावा, आपली संस्कृती, परंपरा, कला, स्थापत्य व खाद्यसंस्कृती यांची माहिती व्हावी, हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. मागील चार वर्षांपासून संस्थेच्या वतीने पुण्यकथा या पुस्तकाचे काम सुरू आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *