पुणे–कोरोनाच्या काळात अनेक आरोपी पॅरोल तसेच फर्लोवर सुटून आले आहेत. त्याचप्रमाणे वाढती बेरोजगारी यामुळे पुणे शहरात गुन्हे वाढत असण्याची शक्यता पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केली. अमिताभ गुप्ता यांनी नुकताच पुण्याचे पोलीस आयुक्तपदी रुजू झाले आहेत. आम्हाला सर्व प्रकारच्या गॅंग संपुष्टात आणायच्या आहेत. आम्ही ते करून दाखवणार आणि केल्यानंतर सांगणार असा दावा गुप्ता यांनी केला.
बांधकाम व्यावसायिक राजेश कानाबार खून प्रकरणी पुणे पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. कानाबार यांचा शनिवारी दुपारी गोळ्या घालून खून करण्यात आला होता..पुणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अगदी जवळ असलेल्या एसबीआय कॉर्नर ला भर दिवसा हा खून झाला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
या गुन्ह्यातील आरोपींना अवघ्या 24 तासांत अटक करण्यात पोलिसांना यश आल आहे. जागेच्या वादातून हा खून झाल्याचं निष्पन्न झालं आहे. .राहुल कांबळे, रुपेश कांबळे, गणेश कुऱ्हे, हसमुख पटेल या आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील हसमुख पटेल याने सुपारी घेऊन हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याशिवाय गेल्या आठवड्यात झालेल्या इतर 4 खुनाच्या गुन्ह्यांचा देखील उलगडा झाला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यातील सर्व म्हणजे पाचही खुनातील आरोपींना पोलिसांनी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे.