बांधकाम व्यवसायिकांनी न घाबरता तक्रार देण्यासाठी पुढे या – पोलीस आयुक्त


पुणे- शहरातील काही असामाजिक घटकांकडून बिल्डरचा छळ होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र बांधकाम विकसक तक्रार दाखल करीत नसल्याने अशांवर पुढील कारवाई करण्यास मर्यादा येतात. हे लक्षात घेत बांधकाम व्यवसायिकांनी न घाबरता तक्रार देण्यासाठी पुढे येत पोलिसांना सहकार्य करावे. जेणेकरून या घटकांवर योग्य कारवाई करणे शक्य होईल, असे आश्वासन पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले. गरज पडल्यास माझ्याशी देखील वैयक्तिक संपर्क साधा, मी स्वत: यामध्ये जातीने लक्ष घालेल असेही त्यांनी सांगितले.

क्रेडाई पुणे मेट्रोची विशेष सर्वसाधारण सभा आज ऑनलाईन पद्धतीने पार पडली, त्यावेळी गुप्ता बोलत होते. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट, सचिव आदित्य जावडेकर यांबरोबर क्रेडाई पुणे मेट्रोचे अनेक पदाधिकारी आदी या वेळी उपस्थित होते.

अधिक वाचा  उरवडे येथील रासायनिक कंपनीला लागलेल्या भीषण आगीत 18 जणांचा होरपळून मृत्यू: 15 महिलांचा समावेश?

या वेळी बोलताना गुप्ता म्हणाले, “बांधकाम व्यवसायिकांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी आमची आर्थिक गुन्हे शाखा सदैव तत्पर असून या ठिकाणी बांधकाम व्यवसायिक ऑनलाईन पद्धतीनेही तक्रार नोंदवू शकतात. शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेत सर्व निवासी सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असावेत असा आमचा आग्रह आहे. शहरात आज पर्यंत १० हजार कॅमेरे बसविण्यात आले असून नजीकच्या भविष्यात ही संख्या आम्ही किमान १४ हजारांवर नेणार आहोत.”   

बांधकाम साईट्सवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने तेथे होणारे अपघात व इतर बाबींच्या तपासात नक्कीच मदत मिळेल, असेही गुप्ता म्हणाले. साईट्सवर अपघात होऊ नयेत याची योग्य ती खबरदारी बांधकाम व्यवसायिकांनी घ्यावे असे आवाहन देखील त्यांनी केले.

सर्वसाधारण सभेत बोलताना पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे म्हणाले की, नजीकच्या भविष्यात सूक्ष्म पातळीवर होणारा नगरविकास हा महत्त्वाचा मुद्दा असल्याने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएचे महत्त्व आणखी वाढणार असल्याचे सूतोवाच सुहास दिवसे यांनी केले. ते पुढे म्हणाले की, निवासी अथवा औद्योगिक कोणत्याही भागाचा विकास करताना सर्वसमावेशक व शाश्वत विकास यावर भर देणे आज गरजेचे आहे. हे करीत असताना पाणी, गटारव्यवस्था व घनकचरा व्यवस्थापन याकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे. या बाबी करायच्या असतील तर बांधकाम व्यवसायिकांना त्यांच्या संकल्पना व स्कीम घेऊन पुढे यावे.

अधिक वाचा  पुणेकरांना निरोगी आरोग्य लाभू दे- उद्धव ठाकरे

क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने सभासदांसाठी एक खास मोबाईल अॅप तयार करण्यात आले असून येत्या १५ नोव्हेंबर रोजी त्याचे अनावरण होईल. या अॅपद्वारे सभासदांना कार्यक्रम, बैठका यांच्या माहितीबरोबरच बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील चालू घडामोडी व पुणे मेट्रोच्या विभागातील सर्व सभासदांची माहिती देखील उपलब्ध होऊ शकणार आहे. सदर अॅॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअर अशा दोन्ही ठिकाणी उपलब्ध असेल. यामुळे बांधकाम व्यवसाय क्षेत्राशी संबंधित योग्य त्याच बातम्या सभासदांपर्यंत पोहोचतील असा विश्वास सुहास मर्चंट यांनी या वेळी व्यक्त केला.

आदित्य जावडेकर यांनी प्रास्ताविक केले. सुहास मर्चंट यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर अश्विन त्रीमल यांनी आभार मानले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love