औरंगाबाद महापालिकेत आमची सत्ता आल्यास पहिल्या दिवशी नामांतराचा ठराव करू – चंद्रकांत पाटील


पुणे:- औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी औरंगाबाद महापालिकेला ठराव करावा लागेल. तिथे आमची सत्ता आल्यास पहिल्या दिवशी आम्ही औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा ठराव करू असं सांगत औरंगाबादचं नामकरण हा श्रद्धेचा विषय आहे, संभाजीनगर हे नाव सगळ्यांना मान्य असून हा राजकारणाचा विषय नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

 औरंगाबादच्या नामांतराचा विषय महाविकास आघाडीत  फूट पाडण्याचा नसून, आमच्या अस्मितेचा आहे. देशावर आक्रमण केले, सत्ता गाजवली, जुलूम केले, अशा आक्रमकांचे नाव मिरवायचे का, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी राज्य सरकारला केला.  

पुणे महापालिकेत कोथरूड मतदारसंघ आणि शहरातील नागरी प्रश्नांसंदर्भात आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून भाजप महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यावर हा फूट पाडण्याचा विषय नसून, आमच्या अस्मितेचा विषय आहे. त्याला राजकीय विषय करू नका, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

अधिक वाचा  सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं-सचिन पायलट

विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असताना औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या ठराव करण्यात आला. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्या वेळी तत्कालीन राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करून हा ठराव मागे घेतला. त्यामुळे आता औरंगाबाद महापालिकेत नव्याने नामांतराचा ठराव करावा लागेल, त्यानंतर तो राज्य सरकारमार्फत केंद्राच्या नगर विकास विभागाकडे पाठवावा लागेल. ही प्रक्रिया पूर्ण करण्याऐवजी वाद कशाला घातलाय, अशी विचारणाही त्यांनी सरकारला केली.

केंद्रात आणि राज्यातही भाजपची सत्ता असताना नामांतर का केले नाही असा प्रश्न विचारला असता, ‘आमच्या वेळेस झाले नाही म्हणून आताही ते होऊ नये असं नाही, असं म्हणत पाटील यांनी वेळ मारून नेली. तर, एनडीएचा घटकपक्ष असलेल्या आरपीआयचे नेते रामदास आठवले यांचा नामांतरास विरोध आहे, याकडे लक्ष वेधले असता, ‘आपल्या देशात प्रगल्भ लोकशाही आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. भाजपच्या कोणाचाही नामांतराला विरोध नाही आणि असू शकत नाही,’ असेही ते म्हणाले.

अधिक वाचा  मोहन भागवतांच्या विधानाने माझ्या ज्ञानात भर पडली- शरद पवार

मनसे जोपर्यंत ते परप्रातियांबद्दल भूमिका बदलत नाहीत, तोपर्यंत त्यांची आमची मुंबई महापालिकेत युती होऊ शकत नाही,” असे चंद्रकांत पाटील स्पष्ट केले.

रश्मी ठाकरेंना पत्र: “माझ्यासाठी विषय संपला”

माझ्या दृष्टीने विषय संपला आहे. मी फक्त वहिनींना तुम्ही सुसंस्कृत महिला संपादक असताना ही भाषा तुमच्या नावाला चिकटतेय. असे म्हणून शेवटी असं म्हटलं होतं की, पण तुम्हाला जर ती भाषा चालणार असेल, तर शुभेच्छा. आता काय चाललंय हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आमच्या दृष्टीने हा विषय संपला आहे,” असं म्हणत पाटील यांनी रश्मी ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रावर अधिकच बोलणे टाळले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love