पुणे- अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करून त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा बनाव केला खरा परंतु तो त्यांच्या अंगलट आले आहे. पोलिसांना या प्रकरणाची कुणकुण लागल्याने त्यांनी प्रियकराला ताब्यात घेतल्यानंतर त्याने खून केल्याची कबुली दिली आहे. पत्नी व प्रियकराला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे.
मनोहर हांडे (वय 22) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी अश्विनी मनोहर हांडे (वय 19, रा. उरुळी कांचन) व प्रियकर गौरव सुतार चव्हाण (वय 19, फुरसुंगी) या दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर आणि अश्विनी यांचे सहा महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. लग्नाआधी अश्विनी आणि गौरव यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम. दोघांनाही विवाह करायचा होता. परंतु घरच्यांची परवानगी नसल्यामुळे त्यांना विवाह करता आला नाही. अशातच अश्विनीच्या कुटुंबीयांनी जानेवारीमध्ये तिचा विवाह मनोहर यांच्याशी लावून दिला. दरम्यान गौरव आणि अश्विनी यांना एकमेकांपासून करमत नव्हते. त्यामुळे त्यांनी एके दिवशी हा भयानक कट रचून त्यांनी कोरोनाचा फायदा उचलण्याचे ठरवले.
एके दिवशी आरोपी गौरव यांनी अश्विनी हिच्याकडे झोपेच्या गोळ्या आणून दिल्या. अश्विनीने झोपण्यापूर्वी दुधात या गोळ्या टाकून हे दूध मनोहरला पिण्यासाठी दिले. त्यानंतर तो गाढ झोपेत असताना गळा आवळून त्याचा खून केला. दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी मनोहर उठत नसल्याचा कांगावा करत त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी उपचारानंतर त्याला मृत घोषित केले.
मनोहरचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला अन्…दरम्यान दोघाही आरोपींना कोरोनामुळे शवविच्छेदन होणार नाही, असे वाटले. मात्र मनोहरचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि शवविच्छेदन झाले. परंतु त्यातूनही मृत्यूचे ठोस कारण समोर आले नाही. मात्र ससून रुग्णालयाने याची माहिती लोणी काळभोर पोलीस दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात दाखल केली होती.
लोणी काळभोर पोलीस या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेऊन होते. काही दिवसांनी त्यांना याप्रकरणी गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी गौरव याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.